चार ठिकाणी आग; लाखोंची हानी
By Admin | Updated: April 18, 2016 02:13 IST2016-04-18T02:13:23+5:302016-04-18T02:13:23+5:30
अकोला शहरात चार विविध ठिकाणच्या प्रतिष्ठानांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांची हानी.

चार ठिकाणी आग; लाखोंची हानी
अकोला : शहरात चार विविध ठिकाणच्या प्रतिष्ठानांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांची हानी झाली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे. पातूर रोडवरील हिंगणा फाट्यानजीक असलेल्या मोहित ऑइल मिलला रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये ऑइल मिलमधील सरकी, ढेप, पोत्यांचा बारदाना, जुने साहित्य जळून खाक झाल्याने ऑइल मिल मालकाचे नुकसान झाले. दोन गोदामातील साहित्यालाही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या पाच वाहनांनी ३0 फेर्या करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर जुने शहरातील शिवाजीनगरमध्ये एका गोठय़ाला शनिवारी उत्तररात्री आग लागल्याची घटना समोर येताच अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून ही आग विझविली. यामध्ये किरकोळ आर्थिक नुकसान झाले आहे. यासोबतच संतोषी माता मंदिर परिसरातील रॉयल बेकरीनजीक असलेल्या एका किराणा दुकानाला रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आग लागून हजारोंचे नुकसान झाले. शहरालगत असलेल्या गुडधी येथील एका घराला व कडब्याच्या गंजीलाही आग लागली असून, यामध्ये आर्थिक नुकसान झाले आहे. चारही ठिकाणच्या आगीत लाखोंची हानी झाली असून, मनपाच्या अग्निशमन विभागाने ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.