प्रेमविवाह केल्याच्या रोषातून घर जाळले!
By Admin | Updated: April 21, 2016 01:55 IST2016-04-21T01:55:17+5:302016-04-21T01:55:17+5:30
मुलीच्या वडिलांचा प्रताप; खामगाव तालुक्यातील घटना.

प्रेमविवाह केल्याच्या रोषातून घर जाळले!
खामगाव (जि. बुलडाणा) : प्रेमविवाह केल्याच्या रोषातून मुलीच्या वडिलाने मुलाचे घर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना तालुक्यातील गोंधनापूर येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लीलाबाई अर्जुन केनेकर (४५ रा.गोंधनापूर) यांच्या सागर नामक मुलाने काही दिवसांपूर्वी गावातीलच विनोद गोविंदा बोंबटकार यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला असून, ते दोघेही औरंगाबाद येथे राहतात. या प्रेमविवाहावरून केनेकर व बोंबटकार कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला.
दरम्यान, १९ एप्रिल रोजी सायंकाळी विनोद बोंबटकार यांच्यासह तिघांनी सागर केनेकर याचे कुडाचे घर पेट्रोल टाकून जाळले. यात घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. लीलाबाई केनेकर यांनी उपरोक्त आशयाची फिर्याद खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून विनोद बोंबटकार याला अटक केली आहे.