अत्याधुनिक स्वच्छतागृहांसाठी मुहूर्त सापडेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 13:09 IST2018-11-10T13:08:57+5:302018-11-10T13:09:06+5:30
महापौर विजय अग्रवाल जिल्हा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करीत असले तरी स्वच्छतागृह उभारणीचा नेमका मुहूर्त कधी निघणार, असा सवाल अकोलेकर उपस्थित करू लागले आहेत.

अत्याधुनिक स्वच्छतागृहांसाठी मुहूर्त सापडेना!
अकोला: बाजारपेठेमध्ये खरेदीसह विविध कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्यांची कुचंबणा ध्यानात घेता शहरातील मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याचे आश्वासन सत्ताधारी भाजपाने अकोलेकरांना दिले होते. स्वच्छतागृहांसाठी मनपा प्रशासनाने दहा जागांचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला जिल्हाधिकाºयांची मंजुरी मिळावी यासाठी महापौर विजय अग्रवाल जिल्हा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करीत असले तरी स्वच्छतागृह उभारणीचा नेमका मुहूर्त कधी निघणार, असा सवाल अकोलेकर उपस्थित करू लागले आहेत.
शहरात स्वच्छतागृहांची वानवा असल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने खुल्या जागा, शासकीय आवारभिंतीलगतच्या जागेचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यभागी वसलेल्या मुख्य बाजारपेठेमध्ये मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृहांची उभारणी आवश्यक आहे. सद्यस्थितीत बोटावर मोजता येणाºया परंतु दृष्टीस न पडणाºया स्वच्छतागृहांमुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. गत वर्षी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शहरात सात ते आठ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आली; परंतु सदर स्वच्छतागृहांची देखभाल ठेवल्या जात नसल्याने त्या ठिकाणी घाण व दुर्गंधीचे साम्राज्य आहे. शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियान अंतर्गत नागरिकांसाठी मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. बाजारपेठेत येणाºया तसेच विविध कामानिमित्त शहरात दाखल होणाºया नागरिकांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे. ही बाब लक्षात घेता महापौर विजय अग्रवाल यांनी मुख्य बाजारपेठसह शहराच्या इतरही भागात मोक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते. या विभागाने पहिल्या टप्प्यात १० जागा निश्चित करून प्रस्तावाला मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहे. तूर्तास हा प्रस्ताव लालफीतशाहीत रखडल्यामुळे अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
प्रस्तावात दहा जागांचा समावेश!
* दुर्गा चौकातील मुख्य नाला
* जवाहर नगर चौक
* सिव्हिल लाइन चौक (जि.प. सर्किट हाऊस)
* सिटी कोतवाली चौक, हायड्रंटजवळ
* कोठडी बाजार, मुख्य नाल्याजवळ
* जुना धान्य बाजार
* गांधी चौक, जैन मंदिरालगत
* टिळक रोड, आकार डेव्हलपर्सजवळ
* जय हिंद चौक, जि.प. उर्दू शाळेचा आवार
* मंगरूळपीर रोड, क्लासिक बारजवळील नाला