अखेर ‘त्या’ नातवाचा मृतदेह आढळला; आजोबाच्या तंबाखूच्या डबी काढण्याचा प्रयत्नात गेलेला वाहून
By राजेश शेगोकार | Updated: September 14, 2022 17:01 IST2022-09-14T17:00:41+5:302022-09-14T17:01:44+5:30
तांदूळवाडी येथील ६० वर्षीय शेतकरी प्रभाकर प्रल्हाद लावणे व त्यांचा ११ वर्षीय नातू आदित्य विनोद लावणे हे जवळच असलेल्या सोनबर्डी येथे म्हैस घेऊन गेले होते.

अखेर ‘त्या’ नातवाचा मृतदेह आढळला; आजोबाच्या तंबाखूच्या डबी काढण्याचा प्रयत्नात गेलेला वाहून
अकोला : अकोट तालुक्याच्या तांदुळवाडी येथील आजोबा प्रभाकर प्रल्हाद लावणे व त्यांचा नातून आदीत्य लावणे हे दोघेही मोहाडी नदीच्या पुरात वाहून गेले होते. बचाव पथकाने शोध घेतला असता आजोबांचा मृतदेह मिळून आला. मात्र नातवाचा शोध सुरूच होता. यासाठी जिल्ह्यातील पाच पथके तैनात करण्यात आली होती. अखेर शोधमोहिमला यश आले असून, त्या नातवाचा मृतदेह दि.१४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास प्रिंप्री डिक्कर-देवरी परिसरात आढळून आला आहे. नदीपात्रात वाहून गेल्याने आजोबा, नातवाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
तांदूळवाडी येथील ६० वर्षीय शेतकरी प्रभाकर प्रल्हाद लावणे व त्यांचा ११ वर्षीय नातू आदित्य विनोद लावणे हे जवळच असलेल्या सोनबर्डी येथे म्हैस घेऊन गेले होते. सोनबर्डी येथून घराकडे परत येताना मोहाडी नदीच्या पुलावर आजोबा प्रभाकर लावणे यांची तंबाखूची डबी पाण्यात पडली. तसेच नातवाची चप्पलसुद्धा पाण्यात पडली. दोन्ही वस्तू पाण्यातून बाहेर काढताना नातवाचा पाय घसरून तो पाण्यात पडला होता. नातू वाहत जात असल्याचे दिसताच आजोबा प्रभाकर लावणे यांनी नदीपात्रात उडी घेऊन नातवाला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही पुरात वाहून गेले होते. मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी आजोबाचा मृतदेह शोधण्यात यश आला होता. रात्री उशीरापर्यंत नातवाचा शोध सुरूच होता. अखेर दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी बचाव पथकाच्या चमुने शोध मोहीम राबवली. यावेळी प्रिंपी डिक्कर-देवरी दरम्यान दुपारी १२ वाजता भगत यांच्या शेताजवळ कपारात व बंगाली बाभळीच्या खाली आदित्यचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर तांदुळवाडी येथे अंत्यसंस्कार पार पडले.