अखेर सिमेंट रस्त्यांच्या निविदा उघडल्या
By Admin | Updated: April 18, 2015 01:53 IST2015-04-18T01:53:21+5:302015-04-18T01:53:21+5:30
पाठपुरावा लोकमतचा; आता प्रतीक्षा महासभेच्या मंजुरीची

अखेर सिमेंट रस्त्यांच्या निविदा उघडल्या
अकोला: मनपाला प्राप्त १५ कोटींच्या अनुदानातून तयार होणार्या सात सिमेंट रस् त्यांच्या निविदा प्रशासनाने गुरुवारी उघडल्या. राजेश्वर कन्स्ट्रक्शनने सादर केलेल्या सातपैकी सहा सिमेंट रस्त्यांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. उर्वरित एका रस्त्यासाठी पुन्हा निविदा प्रकाशित केली जाईल. सहा सिमेंट रस्त्यांची किंमत ६ कोटी २७ लाख ३७ हजार असून, हा प्रस्ताव महासभेने मंजूर केल्यानंतरच कंत्राटदाराला कार्यादेश दिल्या जाणार आहेत. शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता मनपाचे तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी यांनी दोन वर्षांंपूर्वी रस्ता दुरुस्तीच्या निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. शासनाने १५ कोटी रुपये मंजूर केल्यानंतर प्रशासनाने १८ रस्त्यांची कामे प्रस्तावित केली. डांबरीकरण रस्त्याच्या निविदा मंजूर केल्यानंतर सिमेंट रस्त्यांच्या निविदेला ग्रहण लागले होते. सिमेंट रस्त्यांसाठी रेडी मिक्स प्लँटची अट नमूद असल्याने कंत्राटदारांनी हात वर केले. यामुळे प्रशासनाला सिमेंट रस्त्यांसाठी तब्बल सात वेळा निविदा प्रकाशित करावी लागली. खड्डय़ांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, अकोलेकरांना रस्त्यावरून धड चालणेही मुश्कील झाले. शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते, अशी केविलवाणी अवस्था आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज अपघात घडत आहेत. मनपा प्रशासन व सत्ताधारी-विरोधकांची उदासीन भूमिका लक्षात घेता, नागरिकांमध्ये संतापाची तीव्र भावना आहे. यासंदर्भात लोकमतने सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाला निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास भाग पाडले. परिणामी निविदा उघडण्यात आल्याने ६ रस्त्यांच्या दुरुस्तीचा मार्ग उशिरा का होईना अखेर मोकळा झाला आहे.