अखेर महापालिका स्थायी समितीचे पुनर्गठण
By Admin | Updated: April 14, 2015 01:51 IST2015-04-14T01:51:17+5:302015-04-14T01:51:17+5:30
महापौरांनी केली आठ सदस्यांची निवड; नगरसेवकांचा आक्षेप.

अखेर महापालिका स्थायी समितीचे पुनर्गठण
अकोला: महापालिका स्थायी समितीच्या उर्वरित आठ सदस्यांची महापौर उज्ज्वला देशमुख यांनी निवड करीत स्थायी समितीच्या पुनर्गठणावर शिक्कामोर्तब केले. भाजपच्या यादीतील गीतांजली शेगोकार, प्रतिभा अवचार यांच्याऐवजी नगरसेवक आशिष पवित्रकार व सुरेश अंधारे यांची निवड करण्यात आली. तर भारिप-बमसंचे रामा तायडे यांच्या निवडप्रकरणी महापौरांच्या निर्णयावर ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम, विजय अग्रवाल यांनी तीव्र आक्षेप नोंदवित निवड प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप सोमवारी पार पडलेल्या सभेत केला. महापालिकेच्या मुख्य सभागृहात स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवडीची स्थगित विशेष सभा पार पडली. सभेला सुरुवात होताच, ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी ७ एप्रिल रोजीच्या सभेत भारिप-बमसंने उपस्थित केलेल्या तौलानिक संख्याबळाचा मुद्दा सभागृहात स्पष्ट केला. प्रशासनाने निश्चित केलेल्या तौलानिक संख्याबळानुसार अकोला विकास महासंघातून एका नगरसेवकाची निवड होणे अपेक्षित असल्याचे सुनील मेश्राम यांनी सभागृहात सांगितले. त्यावर महापौर उज्ज्वला देशमुख यांनी गटनेता हरीश आलीमचंदानी यांना लखोट्यातील नावे वाचण्याचे निर्देश दिले. आलीमचंदानी यांनी सर्वप्रथम भाजपच्यावतीने नगरसेवक आशिष पवित्रकार, सुरेश अंधारे यांची नावे वाचून काढली. त्यानंतर काँग्रेसच्यावतीने दिलीप देशमुख, अब्दुल जब्बार, शिवसेनेकडून गायत्रीदेवी मिश्रा, अकोला विकास आघाडीतून विजय अग्रवाल, अकोला शहर विकास आघाडीच्या हाजराबी अ.रशीद व भारिप-बमसंचे रामा तायडे यांची नावे वाचली असता, क्षणाचाही विलंब न लावता महापौर उज्ज्वला देशमुख यांनी सर्वांच्या नावाला मंजुरी दिली. महापौरांच्या निर्णयावर सुनील मेश्राम, विजय अग्रवाल यांच्यासह गंगा शेख बेनीवाले व इतर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवत गोंधळ घातला. या गदारोळातच महापौरांनी सभा संपल्याचे जाहीर केले.