अखेर मुहूर्त सापडला; नोटीस दिल्यावर सव्वा वर्षाने अनधिकृत बांधकाम धराशायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:17 IST2018-07-11T13:15:23+5:302018-07-11T13:17:22+5:30
अकोला: इमारतीचा भाग अनधिकृत असल्याचे मोजमापात आढळून आल्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेच्या दक्षिण झोन कार्यालयाला सव्वा वर्षांनंतर का होईना मुहूर्त सापडला.

अखेर मुहूर्त सापडला; नोटीस दिल्यावर सव्वा वर्षाने अनधिकृत बांधकाम धराशायी
अकोला: इमारतीचा भाग अनधिकृत असल्याचे मोजमापात आढळून आल्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेच्या दक्षिण झोन कार्यालयाला सव्वा वर्षांनंतर का होईना मुहूर्त सापडला. लोकमतमधील वृत्ताची दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या आदेशानुसार कौलखेडस्थित वझे ले-आउटमधील मालमत्ताधारक दत्तात्रय सदाशिव काळे यांच्या इमारतीचा अनधिकृत भाग जमीनदोस्त करण्याची कारवाई अतिक्रमण विभागाने पार पाडली.
कौलखेड परिसरातील वझे ले-आउटमधील दत्तात्रय काळे यांनी निवासी इमारतीचे नियमापेक्षा जास्त बांधकाम केल्याची तक्रार आर.टी.मुळे यांनी वर्षभरापूर्वी मनपाकडे केली होती. प्रशासनाने काळे यांना बांधकामासाठी ६३ चौरस मीटर क्षेत्रफळाची बांधकाम परवानगी दिली असताना, काळे यांनी ११०.३९ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम केले. अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी वजा तक्रार आर.टी. मुळे यांनी दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर, नगर रचना विभागाकडे केली होती. मुळे यांच्या प्राप्त तक्रारीवरून प्रशासनाने मालमत्ताधारक दत्तात्रय काळे यांच्या इमारतीचे मोजमाप केले असता, ४७.७९ चौरस मीटर क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम आढळून आले. याप्रकरणी प्रशासनाने दत्तात्रय काळे यांना १२ एप्रिल २०१७ रोजी अंतिम नोटीस जारी केली होती. त्यानंतर झोन अधिकारी, नगर रचना विभागाने अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई करणे अपेक्षित असताना चक्क सव्वा वर्षांपर्यंत प्रशासनाला मुहूर्तच सापडला नाही. अखेर लोकमतमधील वृत्ताची दखल घेत मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार, नगर रचना विभाग व अतिक्रमण विभागाने ९ जुलै रोजी इमारतीचा अनधिकृत भाग तोडण्याची कारवाई पार पाडली.