अखेर ८४ खेडी अकोला जि.प.च्या गळ्य़ात!

By Admin | Updated: April 2, 2017 03:04 IST2017-04-02T03:04:57+5:302017-04-02T03:04:57+5:30

संयुक्त पाहणीनंतर एमजेपीने संपूर्ण रेकॉर्ड दिले ताब्यात

Finally, 84 villages in Akola Zilla! | अखेर ८४ खेडी अकोला जि.प.च्या गळ्य़ात!

अखेर ८४ खेडी अकोला जि.प.च्या गळ्य़ात!

अकोला, दि. १-आधीच प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालवणे जिल्हा परिषदेसाठी जिकिरीचे झाले असताना आता ८४ खेडी प्रादेशिक योजनेतील ७९ गावांना पुरवठय़ाची जबाबदारीही येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा विभागाच्या गळ्य़ात पडत आहे. मनुष्यबळ आणि तांत्रिक सेवा पुरवठय़ाच्या अभावात या योजनेकडे लक्ष देणे जिल्हा परिषदेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. शासन आदेशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही योजना हस्तांतरित करून आपली मुक्तता करून घेतली, हे विशेष.
अकोट ८४ खेडी योजनेतून अकोट, अकोला, तेल्हारा तालुक्यातील ७९ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचवेळी या ग्रामपंचायतींकडे तब्बल १३ कोटी ९५ लाख ८२ हजार रुपये एवढी पाणीपट्टीची थकबाकी आहे. गेल्यावर्षी २0१५-१६ च्या टंचाईमध्ये योजनेला निधी मंजूर करतानाच तो हस्तांतरित करण्याचेही शासनाने बजावले. त्यावेळी १0 कोटी २0 लाख ७0 हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. टंचाई काळातील कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पूर्ण केल्यानंतर योजनेची देखभाल व दुरुस्ती, योजना व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचे आदेशात नमूद होते. टंचाईतील विशेष दुरुस्तीची कामे ३१ मार्च २0१७ रोजी पूर्ण झाली. शासनाच्या आदेशानुसार, ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग आधीच मोकळा होता. त्यामुळे जीवन प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला १६ मार्च २0१७ रोजी पत्र दिले. त्यामध्ये १ एप्रिलपासून योजना हस्तांतरित करून घेण्याचे कळवण्यात आले.
योजनेची संयुक्त पाहणीही पूर्ण
योजना हस्तांतरित करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांच्यासह योजनेची संयुक्त पाहणी केली. त्यानंतर योजनेशी संबंधित संपूर्ण रेकॉर्ड पाणीपुरवठा विभागाकडे देण्यात आले. त्यानुसार ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजतापासून जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेने पाणीपुरवठय़ाचे काम बंद करत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी बैठक घेत पर्यायावर विचार करण्याचे सांगितले. त्यानुसार आणखी दोन ते तीन दिवस प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा सुरळित ठेवला जाणार आहे.
योजनेवर अवलंबून असलेली गावे
८४ खेडी प्रादेशिक योजनेमध्ये सर्वाधिक गावे खारपाणपट्टय़ातील आहेत. त्यामध्ये अकोट तालुक्यातील लोहारी बुद्रुक, लोहारी खुर्द, मुंडगाव, लामकाणी, तांदूळवाडी, सोनबर्डी, आलेगाव, पिंप्री डिक्कर, देवरी, पाटसुल, वारुळा, वणी, बळेगाव, आलेवाडी, पळसोद, देवर्डा, पारळा, टाकळी खुर्द, निजामपूर, चोहोट्टाबाजार, करोडी, किनखेड, करतवाडी, पिलकवाडी, नखेगाव, राजुरवाडी, टाकळी बुद्रुक, नांदखेड, आगासखेड, सालखेड, धामणा बुद्रुक, कालवाडी, खापरवाडी बुद्रुक, खापरवाडी खुर्द, वरूर जऊळका, लोतखेड, दिनोडा, मरोडा, कावसा खुर्द, कावसा बुद्रुक, देऊळगाव, तरोडा, रेल, धारेल, गिरजापूर, पनोरी, दनोरी, केळीवेळी, जऊळखेड बुद्रुक, जऊळखेड खुर्द, धनकवाडी, ढगा, करतवाडी, कवठा खुर्द, कवठा बुद्रुक, सावरगाव, विटाळी, रौंदळा हिलालाबाद, हनवाडी, सांगवी, ठोकबर्डी, पुंडा, बांबर्डा, रोहनखेड, तेल्हारा तालुक्यातील नेर, पिवंदळ, गरसोळी, पातोंडा, अकोला तालुक्यातील दहीहांडा, वडद खुर्द, रोहणा, ब्रम्हपुरी, काटी-पाटी.

Web Title: Finally, 84 villages in Akola Zilla!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.