मनपा आयुक्तांसह जलवर्धन संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 17, 2016 02:28 IST2016-08-17T02:28:08+5:302016-08-17T02:28:08+5:30
शोषखड्डय़ातील दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणी अकोला मनपा अयुक्तासह अभियंता, कंत्राटदारावर गुन्हा.

मनपा आयुक्तांसह जलवर्धन संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला, दि. १६ : आदर्श कॉलनीमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक १६ च्या मैदानावर मनपा प्रशासन आणि जलवर्धन संस्थेद्वारे खोदण्यात आलेल्या शोषखड्डय़ातील पाण्यात बुडून रविवारी दोन बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खदान पोलिसांनी बालकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मनपा आयुक्त अजय लहाने, जलवर्धन संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, मनपाचे संबंधित अभियंता आणि कंत्राटदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या शोषखड्डय़ात सिद्धार्थ राजेश घनगावकर आणि कृष्णा राकेश बहेल या दोन बालकांचा मृत्यू झाला होता.
आदर्श कॉलनी परिसरातील मित्रनगरला लागून असलेल्या वसाहतमधील रहिवासी राजेश घनगावकर यांचा मुलगा सिद्धार्थ (७) आणि याच परिसरातील रहिवासी राकेश बहेल यांचा मुलगा कृष्णा (१0) हे दोघे मनपाच्या शाळा क्रमांक १६ च्या मैदानावर खेळत होते. या मैदानावर मनपा प्रशासन आणि जलवर्धन या संस्थेने खोल चर खोदलेले होते. यामध्येच १0 फूट खोलीचे तीन शोषखड्डे खोदण्यात आले होते. या शोषखड्डय़ांचे बांधकाम पूर्ण न केल्याने खड्डय़ात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. कृष्णा आणि सिद्धार्थ हे दोघे येथे खेळत असतानाच ते शोषखड्डय़ात पडले. शोषखड्डय़ात गाळ असल्याने दोघेही या गाळात फसून त्यांचा मृत्यू झाला. जलवर्धन संस्थेने बांधलेल्या या तीन शोषखड्डय़ांची कामे त्यांनी अर्धवट केली होती. त्यामुळे दोन बालकांचा बळी गेला. जलवर्धन संस्थेने केलेल्या अर्धवट कामामुळे आणि मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दोन चिमुकल्यांचा जीव गेला असून, या प्रकरणी सिद्धार्थचे वडील राजेश घनगावकर यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून मनपा आयुक्त अजय लहाने, जलवर्धन संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, मनपाचे संबंधित अभियंता, कंत्राटदार यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0४ अ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिका-यांवरील गुन्हे ह्यअजामीनपात्रह्ण
मनपा आयुक्तांसह जलवर्धन संस्थेच्या पदाधिकार्यांविरुद्ध खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे नॉन बेलेबल असल्याची माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणातील जलवर्धन संस्थेच्या अध्यक्ष पदाधिकार्यांसह संबंधित अधिकार्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करण्याची मागणी बालकांच्या नातेवाइकांनी केली आहे.