मनपाच्या तत्कालीन आयुक्तांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा!
By Admin | Updated: July 20, 2016 01:45 IST2016-07-20T01:45:50+5:302016-07-20T01:45:50+5:30
करारात खोडतोड, देयकाच्या बदल्यात दलालीची मागणी केल्याचा आरोप; गुन्हा दाखल करण्याचा प्रथम श्रेणी न्यायालयाचा आदेश.

मनपाच्या तत्कालीन आयुक्तांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा!
अकोला: मॅक्सिन कॉर्पोरेशन नामक कंपनीसोबत केलेल्या करारात खोडतोड करून कार्यादेश रद्द करणे व देयकाच्या बदल्यात दलालीची मागणी केल्याचा ठपका ठेवत महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला. महापालिकेच्या अग्निशमन विभागातील वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रशासनाने कंत्राट मुनव्वर शेख अब्दुल सत्तार यांच्या मॅक्सिन कॉर्पोरेशन कंपनीला दिला होता. याकरिता तब्बल ३0 वर्षांचा करारनामा केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हे उपस्थित झाले होते. यादरम्यान, मुनव्वर शेख यांनी पालिका प्रशासनाकडे १८ लाखांचे देयक सादर केले. तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त डॉ.उत्कर्ष गुटे यांनी देयक अदा करण्याच्या बदल्यात २0 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप तक्रारकर्त्या शेख यांनी केला. दलालीची रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे पालिका प्रशासनाने करारनामा व कार्यादेश (वर्कऑर्डर) रद्द केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच सहायक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दूर, अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे व कर्मचारी मनीष कथले यांच्या माध्यमातून करारनाम्याच्या दस्तावेजमध्ये खोडतोड केली. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता पोलिसांनी प्रतिसाद न दिल्यामुळे मुनव्वर शेख यांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली. सदर याचिकेवर प्रथम श्रेणी न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली असता न्यायदंडाधिकारी यशदीप मेश्राम यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे, सहायक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दूर, अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे व मनीष कथले यांच्या विरुद्ध कलम १२0 (ब), ४२0, ४0९, ४६८, ४७१, ५0४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे.