शेतक-यांना न्याय मिळावा यासाठीच लढा!
By Admin | Updated: February 6, 2016 02:21 IST2016-02-06T02:20:25+5:302016-02-06T02:21:05+5:30
अल्पावधीतच सोशल मीडियाद्वारा प्रसिद्धीच्या झोतात आलेला छोट्या घनश्यामचा मोठा निर्धार.

शेतक-यांना न्याय मिळावा यासाठीच लढा!
नीलिमा शिंगणे/ अकोला: पैसा जीवनात कोणीही कमवितो, प्रसिद्धीही मिळवितो, पण आपल्याकडील पैसा व प्रसिद्धीचा उपयोग शेतकर्यांना न्याय देण्याकरिता क्वचितच कोणी करीत असेल. मी मला लाभत असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाचा उपयोग फक्त आणि फक्त शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याकरिताच करणार असल्याचे मत सध्या अल्पावधीतच सोशल मीडियाद्वारा प्रसिद्धीच्या झोतात आलेला घनश्याम दराडे या चिमुकल्याने शुक्रवारी सायंकाळी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
सध्या व्हॉट्स अँपवर मुरब्बी राजकारण्यासारखे बोलणार्या एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक मोबाइलधारकहा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. हाच घनश्याम शुक्रवारी अकोल्यात आला होता. घनश्याम दत्तात्रय दराडे असे पूर्ण नाव या मुलाचे आहे. घनश्याम हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार या गावात राहतो. १३ वर्षीय घनश्याम साईकृपा शाळेत आठव्या वर्गात शिकतो. इयत्ता दुसरीला असताना घनश्यामला पोटाच्या विकाराने ग्रासले. या त्रासापायी तो काही वर्षे शिक्षणापासून दूर राहिला असल्याचे घनश्यामची आई अलका दराडे यांनी सांगितले.
अगदी दीड-दोन महिन्यांपूर्वी पिंपळगाव येथील एका कार्यक्रमात घनश्याम राजकीय नेत्यांबाबत त्यांच्याच शैलीत बोलला. ही व्हिडिओ क्लिप काकांनी काढली आणि सहज व्हॉट्स अँपवर टाकल्यानंतर लोकं ओळखायला लागल्याचे घनश्यामने सांगितले. आई पाचवा वर्ग, तर वडील दहावी उत्तीर्ण आहेत. घरात शिक्षणाचे वातावरण नाही. टीव्हीवरील बातम्या, गावात होणार्या जाहीर सभांमधून नेत्यांसारखे बोलणे शिकलो, असे तो म्हणाला.
समवयस्क मुलांसाठी संदेश देत घनश्याम म्हणाला, मी अगदी छोट्या खेडेगावात राहतो. शिक्षणाचीदेखील तेथे सोय नाही. तथापि, आजारातून उठूनही मी शिक्षण घेत आहे. उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मला सर्वच खेळ आवडतात. सर्व विषय अभ्यासायला आवडतात, वाचायला आवडतात.
भविष्यात मी कलेक्टर होणारच आहे. त्यासाठी मी खूप अभ्यास करणार, असे त्याने सांगितले