महिला-पुरुषांना ‘फिफ्टी-फिफ्टी’ संधी!
By Admin | Updated: September 2, 2014 19:51 IST2014-09-02T19:51:30+5:302014-09-02T19:51:30+5:30
कॉँग्रेस नेते इच्छुकांच्या पक्षसंघटनेतील कामगिरीचाही घेणार आढावा

महिला-पुरुषांना ‘फिफ्टी-फिफ्टी’ संधी!
अकोला: विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसने जिल्ह्यात महिला व पुरुषांना समान संधी देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. अकोला पश्चिम, आकोट, अकोला पूर्व या विधानसभा मतदारसंघात महिला इच्छुकांची संख्या कमी नाही. तसेच स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी कॉँग्रेसमधील महिला इच्छुक आहेत. महिलांना राजकारणात समान संधी मिळण्यासाठी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेत ५0 टक्के आरक्षण जाहीर केले. कालपर्यंत केवळ घर सांभाळणारी स्त्री जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगर परिषदांच्या कारभारात आपला ठसा उमटविताना दिसत आहे; मात्र अनेक ठिकाणी 'सौ'ऐवजी त्यांचे 'श्री'च कारभार हाकतानाही दिसून येतात. महिला आरक्षणाचे चित्र केवळ कागदावर न राहता, प्रत्यक्ष नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये प्रतिबिंबित होणे गरजेचे आहे. तरच खर्या अर्थाने महिला आरक्षणामागील हेतू सफल होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विधानसभेच्या अकोला पूर्व, अकोला पश्चिम, आकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर पाच मतदारसंघांसाठी कॉँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. जिल्हा कॉँग्रेस कमेटीकडून हे अर्ज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पाठविण्यात आले होते. अकोला पश्चिम- १८, अकोला पूर्व-0८, आकोट:- ११, बाळापूर:-२५ आणि मूर्तिजापूर मतदारसंघासाठी १0 अर्ज पाठविण्यात आले होते. १७ ऑगस्ट रोजी अकोला पूर्व व पश्चिम, आकोट आणि बाळापूर या चार विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या सामूहिक मुलाखती कॉँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर रविवारी मूर्तिजापूर मतदारसंघातील इच्छुकांशी चर्चा करण्यात आली. महिला मतदारांमध्येही वाढ जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या २00९ साली झालेल्या निवडणुकीच्या तुलनेने यंदा वाढल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. गत पाच वर्षात महिला मतदारांमध्ये ३.७५ टक्के, तर पुरुष मतदारांमध्ये १.२९ टक्के वाढ झाली. २00९ मध्ये पाचही मतदारसंघात एकूण महिला मतदार ६ लाख ५८ हजार ३१८ होत्या, तर २0१४ मध्ये हीच संख्या ६ लाख ८३ हजार ७ एवढी झाली आहे. २00९ मध्ये पाचही मतदारसंघात पुरुष मतदार ७ लाख ३३ हजार ५३७ होते, तर २0१४ मध्ये हीच संख्या ७ लाख ४३ हजार ३३ पर्यंत गेली आहे. महिला मतदारांमध्ये वाढ झाली असली तरी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष महिलांना प्रतिनिधित्व देतात काय, हे येणार्या काळात स्पष्ट होईलच.