पंधरा हजार अकोलेकर चालले ‘अवयव दाना’साठी
By Admin | Updated: January 12, 2015 01:53 IST2015-01-12T01:53:23+5:302015-01-12T01:53:23+5:30
आयएमए वॉकथॉन-२0१५

पंधरा हजार अकोलेकर चालले ‘अवयव दाना’साठी
अँड. नीलिमा शिंगणे / अकोला
किंचितशा धुक्यातून सोन पावलांनी उगवलेली सकाळ. पक्ष्यांच्या चिवचिवटासोबतच हजारो बालकांचा कलकलाट, तरुणांचा जल्लोष अन् वृद्धांचा ओसंडून वाहणारा उत्साह, अशी आजच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात अकोलेकरांनी अनुभवली. निमित्त होतं, आयएमए वॉकथॉन-२0१५ चं. उत्साहपूर्ण वातावरणात पंधरा हजारांवर अकोलेकर आपल्या उत्तम आरोग्यासाठी चालले आणि धावलेदेखील.
गेल्या आठ वर्षांंपासून इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने (आयएमए) अकोला वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आरोग्यासाठी नागरिकांनी धावावे आणि चालावे, यासाठी जनजागृती व्हावी, हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. यावर्षी ह्यअवयव दानह्णविषयी जनजागृती या स्पर्धेतून करण्यात आली. यंदाच्या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण होतं फ्लाइंग शिख मिल्खा सिंग. स्पर्धा दहा, सहा आणि तीन किलोमीटर अशा तीन गटात घेण्यात आली. सकाळी साडेसात वाजता सिव्हिल लाइन भागातील आयएमए हॉल येथून स्पर्धेला प्रारंभ झाला. शहरातील विविध मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत स्पर्धेचा समारोप वसंत देसाई क्रीडांगण येथे झाला. वाह रे अकोला आणि बिनदास बंदे या पोस्टर स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धेतून स्पर्धकांनी आरोग्यासोबतच मुलगी वाचवा, अवयव दान, प्लास्टिक वापराचे तोटे, निसर्ग वाचवा, स्वच्छ भारत आदी विषयी जनजागृती केली.
*एक झलक पाहण्यासाठी आतूरले चाहते.
कॉमनवेल्थ गेममध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक मिळविणारे. आपल्या खेळ कारकिर्दीत ७७ आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविणारे. १९५८, १९६0 आणि १९६२ साल केवळ भारतीय धावपटूंचेच आहे, हे सिद्ध करणारे फ्लाईंग शीख मिल्खा सिंग आणि त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा बॉलीवूड चित्रपट ह्यभाग मिल्खा भागह्ण. यामुळे खेळाडूंच्याच नव्हेतर सामान्य नागरिकांच्याही हृदयात स्थान मिळविणारे भारतीयांची अभिमानाने मान उंचावेल, अशी कामगिरी करणारे मिल्खा सिंग आज अकोल्यात आले होते. आजचा दिवस अकोल्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा, असा ठरला. मिल्खा सिंग यांच्या पदस्पर्शाने अकोला क्रीडाक्षेत्र पावन झाले. या महान खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहते वसंत देसाई क्रीडांगणावर पोहोचले होते.