चिमुकल्या प्रतीक्षाची जग जिंकण्यासाठी भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 01:52 IST2016-03-13T01:52:15+5:302016-03-13T01:52:15+5:30
गणिताच्या परीक्षेत प्रतीक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथी आली.

चिमुकल्या प्रतीक्षाची जग जिंकण्यासाठी भरारी
नीलिमा शिंगणे / अकोला
आई जेमतेम बारावी. वडील बी.ए. द्वितीय वर्ष उत्तीर्ण. आर्थिक परिस्थिती नाजूक. अवघ्या घराण्याचा गणित विषयाशी कधीही सूर-ताल जमला नाही. घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना, अकोल्यातील साडेपाच वर्षीय मुलीने ऑलिम्पियाड परीक्षेत गणित विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथेस्थान मिळविले. प्रतीक्षा प्रदीप मोहोड असे या चिमुकलीचे नाव. प्रतीक्षा आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर अवघं जग जिंकण्यासाठी भरारी घेण्यास लहान वयातच सज्ज झाली आहे.
प्रतीक्षा आर.डी.जी.पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत आहे. डिसेंबर-२0१५ मध्ये सिल्व्हर झोन फाउंडेशन, नवी दिल्लीच्या वतीने इंटरनॅशनल ऑलिम्पियाड परीक्षा घेण्यात आली. प्रतीक्षाने गणित आणि इंग्लिश विषयाच्या प्रथमा परीक्षा दिल्या. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २0१६ च्या शेवटच्या आठवड्याला जाहीर झाला. यामध्ये चिमुकल्या प्रतीक्षाने महाराष्ट्रातून प्रथम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथे स्थान प्राप्त केले. शाळेसाठीच नव्हेतर अकोला जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली. गणित विषयात प्रतीक्षाने १00 पैकी १00 गुण मिळविले. इंग्लिशमध्ये ९४ टक्के गुण मिळविले. प्रतीक्षा ही व्ही.एच.बी. कॉलनी, गोरक्षण रोड येथे राहणारे प्रदीप मोहोड व सुरेखा मोहोड यांची मुलगी आहे. प्रतीक्षाचे वडील घरात ज्येष्ठ असल्याने आई-वडील गेल्यानंतर ऐन तारुण्यात घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. लहान चार भावांचा उदरनिर्वाह करण्याकरिता शिक्षण सोडावे लागले. उपजत असलेली संगीतकला घराला आर्थिक आधार मिळवून देऊ लागली. पाचही भाऊ संगीतामध्ये पारंगत असल्याने अकोला संगीतक्षेत्रात मोहोडबंधू नाव अल्पावधीतच गाजले.ह्यम्युझिकल मेलोडीह्ण नावाने आर्केस्ट्रा गाजला. आज हा आर्केस्ट्रा साउंड ऑफ म्युझिक नावाने चालतो. मात्र, कलेचे मोल कवडीमोल. त्यामुळे मोहोड यांची कला जरी श्रीमंत असली तरी आर्थिक परिस्थिती गरीबच राहिली. अशामध्ये मुलीलाच वंशाचा दिवा मानणारे मोहोड दाम्पत्यांनी आपल्या कन्येला कोणत्याही परिस्थितीत उच्चदर्जाचे शिक्षण देण्याचे ठरविले. प्रतीक्षादेखील आपल्या अंगी असलेल्या गायन कलेला तर जोपासतेच, त्यासोबतच मनाच्या एकाग्रतेने अभ्यास करते. सध्या बालजगताला काटरूनचे वेड लागलेलं आहे. मात्र, प्रतीक्षा यासर्वांपेक्षा वेगळी आहे.