दक्षिण-मध्य रेल्वे मार्गालगतच्या फेंसिंग वॉल गायब
By Admin | Updated: May 16, 2015 00:37 IST2015-05-16T00:37:41+5:302015-05-16T00:37:41+5:30
रेल्वे मार्गावर नागरिकांचा व जनावरांचा वाढता वावर धोकादायकच.

दक्षिण-मध्य रेल्वे मार्गालगतच्या फेंसिंग वॉल गायब
अकोला : दक्षिण-मध्य रेल्वे मार्गालगतच्या वस्त्यांमध्ये राहणार्या नागरिकांचा व पाळीव जनावरांचा रेल्वे मार्गावर वावर वाढला असून, भविष्यात मोठय़ा दुर्घटनेसाठी सदर बाब कारणीभूत ठरू शकते, असे संकेत दक्षिण-मध्य रेल्वेच्या स्थानिक अधिकार्यांनी दिले आहेत. अकोला ते पूर्णा मार्गाचे गेजपरिवर्तन झाल्यानंतर या मार्गावर धावणार्या गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रेल्वेस्थानकावरून निघालेली गाडी न्यू तापडियानगराचा परिसर, मोठी उमरी, पंजाबराव कृषी विद्या पीठालगतचा परिसर आणि अकोल्याच्या औद्योगिक परिसरातून शिवणी या लहानशा रेल्वेस्थानकापर्यंंत जाते. या सर्व भागातील रेल्वे मार्गालगत दोहोबाजूने अत्यंत दाट लोकवस्ती आहे. दक्षतेकरिता गेजपरिवर्तनाप्रसंगी दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गालगत आणि लोकवस्त्यांच्या कडेला १0 ते १२ फूट उंचीच्या पक्कय़ा भिंती बांधल्या होत्या. पण अत्यंत दाटीवाटीने राहणार्या या लोकवस्त्यांमधील नागरिकांनी त्या भिंती पूर्णत: नेस्तनाबूद केल्या आहेत. परिणास्वरूप रेल्वे मार्गावर नागरिकांचा नव्हे, तर पाळीव प्राण्यांचादेखील वावर वाढलेला दिसून येतो. वस्त्यांमधील नागरिकांकरवी रेल्वे मार्गाचा वापर प्रात:विधीसाठी केला जात असून, अन्नाच्या शोधात जनावरे थेट रेल्वे रुळांवर फिरताना दिसून येत आहेत. याचाच प्रत्यय बुधवार, १३ मे रोजी सायंकाळी एमआयडीसी भागातील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक १८ जवळ आला. अकोला रेल्वे स्थानकावरून वाशिमच्या दिशेने निघालेल्या श्रीगंगानगर - नांदेड एक्स्प्रेसच्या समोर तीन गायींची वासरे आलीत व जागीच गतप्राण झाली.