लहान मुलांमध्ये संक्रमणाची भीती; आरोग्य सुविधेची पूर्तता करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST2021-05-08T04:18:46+5:302021-05-08T04:18:46+5:30

अकोला: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय व ...

Fear of infection in young children; Complete the health facility! | लहान मुलांमध्ये संक्रमणाची भीती; आरोग्य सुविधेची पूर्तता करा!

लहान मुलांमध्ये संक्रमणाची भीती; आरोग्य सुविधेची पूर्तता करा!

अकोला: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याव्यतिरिक्त कोव्हॅक्सिन लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण खोळंबले आहे. या दोन्ही मागण्यांसंदर्भात शुक्रवारी मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान व माजी सभापती विनोद मापारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.

संसर्गजन्य कोरोना विषाणूमुळे नागरिकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. पुढील काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भात खुद्द सर्वोच्च न्यायालयाने तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सद्यस्थितीत ठोस उपाययोजना करण्याबाबत सरकारला निर्देशित केले आहे. त्यामुळे शासन आदेशाची वाट न पाहता केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून अकोला जिल्ह्यातील लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केली आहे.

कोव्हॅक्सिन लस तातडीने उपलब्ध करा!

कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेणाऱ्या शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा दुसरा डोस घेण्याची मुदत संपुष्टात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार दुसरा डोस घेण्याची मुदत संपल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असल्याचे नमूद करीत ही लस तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक विनोद मापारी यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Fear of infection in young children; Complete the health facility!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.