नगरसेवक हल्ला प्रकरणातील पिता-पुत्राची कारागृहात रवानगी
By Admin | Updated: December 11, 2015 02:41 IST2015-12-11T02:41:53+5:302015-12-11T02:41:53+5:30
काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल जब्बार यांच्यावर झाला होता हल्ला.

नगरसेवक हल्ला प्रकरणातील पिता-पुत्राची कारागृहात रवानगी
अकोला: काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल जब्बार यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करणार्या पिता-पुत्राची गुरुवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. यातील मुख्य आरोपी महबूब खान ऊर्फ मब्बा पहिलवान व त्यांचा मुलगा फरार आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १५ अ मधील काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल जब्बार व काँग्रेसच्या नगरसेविका शाहीन अंजुम यांचे पती महबूब खान ऊर्फ मब्बा पहिलवान यांच्यात गत काही महिन्यांपासून वॉर्डांतील विकासकामांच्या विषयांवरून वाद सुरू होता. या वादातूनच ७ डिसेंबर रोजी महबूब खान ऊर्फ मब्बा पहिलवान यांच्यासह अन्वर खान बिलावर खान आणि राशीद खान अन्वर खान आणि मब्बा यांच्या मुलाने विरोधी पक्षनेता साजिद खान यांच्या महापालिकेतील कक्षामध्ये लोखंडी पाइपने हल्ला चढविला. यात अब्दुल जब्बार हे गंभीर जखमी झाले होते. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरुद्ध भादंविचे कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल करून अन्वर खान व राशीद खान यांना अटक केली होती.