आता प्रवेशासाठी जीवघेणी स्पर्धा!
By Admin | Updated: June 8, 2016 02:28 IST2016-06-08T02:28:01+5:302016-06-08T02:28:01+5:30
अकोला जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २२ हजारावर, जागा मात्र १0 हजारांपेक्षाही कमी!

आता प्रवेशासाठी जीवघेणी स्पर्धा!
नितीन गव्हाळे / अकोला
जिल्ह्यातील उत्तीर्णतेचे विद्यार्थ्यांची संख्या पाहता यावर्षीही विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चढाओढ राहणार आहे. जिल्ह्यातून विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५८९९ इतकी आहे, तर प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ८५३७ इतकी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेसाठी १0 हजार पेक्षाही कमी प्रवेश क्षमता असल्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगणार आहे.
पुढील शैक्षणिक वाटचालीचा विचार करता बहुतांश विद्यार्थी हे विज्ञान आणि वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. गेल्या काही वर्षांपासून विज्ञानसाठी असलेली चुरस यंदाही कायम राहणार असल्याचे चित्र आहे. शहरात विज्ञान शाखेच्या शहर आणि ग्रामीण भागात विज्ञानाकडे प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचा कल असतो. त्यातही नामांकित महाविद्यालये आपल्याच संस्थेतील विद्यार्थ्यांना आणि प्रावीण्य श्रेणी, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देत असल्यामुळे प्रवेश मिळविण्यासाठी बाहेरील विद्यार्थ्यांंना प्रवेशासाठी चांगलेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. दहावीच्या निकालात विद्यार्थी नव्वदी गाठत असल्यामुळे विज्ञान शाखेवरील ताण वाढला आहे.
उपलब्ध प्रवेश क्षमतेमध्ये सर्वाधिक प्रवेश हे विज्ञान शाखेचेच होत असल्यामुळे निर्धारित मुदतीनंतरही विज्ञान शाखेसाठी विनाअनुदानित तुकडी वाढवून देण्यासाठी महाविद्यालयांकडून आग्रह धरला जातो.