विदर्भातील शेतक-यांना देणार आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती!
By Admin | Updated: October 18, 2014 23:33 IST2014-10-18T23:33:43+5:302014-10-18T23:33:43+5:30
अकोला येथील कृषी विद्यापीठात १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान शिवारफेरी.

विदर्भातील शेतक-यांना देणार आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती!
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नवे संशोधन आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान शिवारफेरीचे आयोजन केले असून, विदर्भातील हजारो शेतकरी या शिवारफेरीत सहभागी होणार असल्याने, कृषी विद्यापीठाने जय्यत तयारी केली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना २0 ऑक्टोबर १९६९ रोजी झाली हो ती. हा स्थापना दिवस दरवर्षी शिवारफेरीने साजरा करण्यात येतो. यानिमित्त विद्यापीठाने केलेले संशोधन, तसेच विकसित केलेल्या नवतंत्रज्ञानाची माहिती शेतकर्यांना दिली जाते. यावर्षी विद्यापीठाने विकसित केलेले जलव्यवस्थापन मॉडेल, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान, देशी, अरबोरियम कापूस, तेलबिया, फलोत्पादन, जैवतंत्रज्ञान, भाजीपाला, कडधान्य, ज्वारी, कमी पाण्यात येणारा गहू आदी प्रकारचे नावीन्यपूर्ण प्रयोग शेतकर्यांच्या माहितीसाठी ठेवले आहेत. कृषी अभियांत्रिकी विभागाने विकसित केलेली कृषी अवजारे, दाळ गिरणी, नवे बायोगॅस तंत्रज्ञान, धान्य प्रतवारी यंत्र, शेडनेट आदी तंत्रज्ञानाची माहितीही शेतकर्यांना दिली जाणार आहे.
विदर्भातील सर्व जिल्हय़ातून येणार्या शेतकर्यांना कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, विषयतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मूलस्थानी जलसंवर्धन, गादी वाफा पेरणी पद्धत, उताराला आडवी कंटुर शेती, योग्य बियाण्याची निवड व पेरणी तंत्रज्ञान, आधुनिक नवे तंत्रज्ञान या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन केले जाईल आणि शेतकर्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात येईल. रविवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी बुलडाणा, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकरी शिवारफेरीत सहभागी होतील. सोमवारी वाशिम, अमरावती, यवतमाळ व नागपूर, तर मंगळवारी अकोला, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हय़ातील शेतकरी या शिवारफेरीत सहभागी होणार आहेत.