वरुड बिहाडे येथील शेतमजूर विजेच्या धक्कय़ाने ठार
By Admin | Updated: July 9, 2016 01:01 IST2016-07-09T01:01:58+5:302016-07-09T01:01:58+5:30
विद्युत खांबाच्या ताणाचा लागला शॉक

वरुड बिहाडे येथील शेतमजूर विजेच्या धक्कय़ाने ठार
तेल्हारा : शेतातीलच विजेच्या खांबाच्या ताणाला स्पर्श होऊन विजेचा जोरदार धक्का लागल्याने तालुक्यातील वरुड बिहाडे येथील २२ वर्षी शेतमजूर ठार झाला.
तालुक्यातील वरूड बिहाडे येथील मनोहर बिहाडे यांच्या शेतात अक्षय अर्जुन खोडके हा २२ वर्षीय युवक ८ जुलै रोजी मोलमजुरीच्या कामाकरिता गेला होता. शेतातील महिलांना पाणी पाजण्याचे मजुरीचे काम आटोपून तो चप्पल घालत असताना त्याने शेतातीलच विजेच्या खांबाच्या ताणाला आधार म्हणून पकडले. त्या विजेच्या खांबाच्या ताणात विद्युत प्रवाह आलेला असल्याने सदर युवकास विजेचा जोरदार धक्का लागून गंभीर जखमी झाला.
उपस्थितांनी त्यास उपचारासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
सदर युवक हा भूमिहीन शेतमजूर असून, त्याची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
इन्सुलेटर असताना तारेत विद्युत प्रवाह कसा?
विद्युत खांबाला आधार म्हणून ताण लावलेला असतो. सदर ताण खांबाच्या स्ट्रपपासून जमिनीकडे असतो. सदर ताणाच्या मध्यभागी चिनीमातीचे इन्सुलेटर बसविलेले असते. त्यामुळे ताणात विद्युत प्रवाह आल्यास तो मध्येच खंडित होतो व जमिनीपर्यंत पोहोचत नाही. असे असताना ताणात विद्युत प्रवाह आलाच कसा, हा प्रश्न निर्माण होत असून, देखभाल दुरुस्ती कागदोपत्री होत असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.