सरळ देशी वाणाच्या पेरणीकडे शेतक-यांचा कल

By Admin | Updated: March 28, 2016 01:24 IST2016-03-28T01:24:59+5:302016-03-28T01:24:59+5:30

देशी कपाशीचे मुबलक बियाणे उपलब्ध नसल्याचे बियाण्यांचा जाणवणार तुटवडा!

Farmer's trend is to direct the country's sowing | सरळ देशी वाणाच्या पेरणीकडे शेतक-यांचा कल

सरळ देशी वाणाच्या पेरणीकडे शेतक-यांचा कल

अकोला: बीटी कपाशीवर होणारा बोंडअळ्य़ांचा प्रादुर्भाव व पावसाची अनिश्‍चितता बघता, मागील वर्षापासून शेतकर्‍यांनी देशी वाणाच्या सघन पेर्‍यावर भर दिला आहे. यापासून चांगले उत्पादन होत असल्याचे लक्षात आल्याने शेतकर्‍यांचा कल देशी कपाशीकडे वाढला आहे; परंतु या कपाशीचे मुबलक बियाणे उपलब्ध नसल्याचे एकूण सर्वच बियाणे निर्मिती स्तरावरील चित्र आहे.
दशकापूर्वी बीटीचे आगमन झाल्यानंतर आजमितीस बियाणे बाजारपेठ बीटीने व्यापली आहे. ९५ टक्के शेतकरी बीटी कपाशीचीच पेरणी करतात; परंतु मागील दोन-चार वर्षांपासून बीटी कपाशीवर बोंडअळीची प्रहारक्षमता वाढली आहे. परिणाम गुलाबी बोंड अळीला प्रतिबंध करण्यासाठी शेतकर्‍यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढला आहे. अगोदरच रस शोषण करणार्‍या किडींमुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यात बोंडअळीला प्रतिबंधक तंत्रज्ञानासाठी बीटी कपाशी ओळखली जात असताना, त्यावर बोंडअळी येत आहे. पावसाची अनिश्‍चितता असल्याने कोरडवाहू क्षेत्रात बीटीला हवे तेवढे पाणी मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी मागील वर्षी अनेक ठिकणी देशी वाणाची पेरणी केली आहे. त्याचे चांगले उत्पादन त्यांना मिळाले.
पावसाचा ताण सहन करणार्‍या व कमी दिवसांत येणार्‍या कपाशीच्या वाणांचा यामध्ये समावेश आहे. अतिघनता लागवड पद्धतीने देशी कपाशीचे पेरणी केल्यास बीटी कापसाच्या बरोबरीने उत्पादन येत असून, कापूस काढल्यांनतर या क्षेत्रावर दुबार म्हणजेच रब्बी पीक घेता येते. त्यामुळे त्याचा पेरा विदर्भात वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
कृषी विद्यापीठाने देशी कपाशीचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना दाखवले आहे. यामध्ये प्रामुख्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या देशी वाणांचा समावेश आहे. त्याचा पेरा वाढावा, हा यामागील उद्देश असून, यावर्षी बर्‍याच शेतकर्‍यांनी कपाशीच्या देशी वाणाची पेरणी केली आहे; परंतु मोजक्याच शेतकर्‍यांना हे बियाणे उपलब्ध होऊ शकले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन विभागाकडे नाममात्र बियाणे आहे.

Web Title: Farmer's trend is to direct the country's sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.