आजपासून जिल्ह्यातील शेतकरी संपावर!
By Admin | Updated: May 31, 2017 01:52 IST2017-05-31T01:52:35+5:302017-05-31T01:52:35+5:30
नियोजनही तयार; मूर्तिजापुरातून अनेकांचा सहभाग

आजपासून जिल्ह्यातील शेतकरी संपावर!
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. लागवडीचा खर्च निघेनासा झाला आहे. शासनाचे धोरण कळायला मार्ग नाही. विदेशातून धान्य, कडधान्य आयातीचे प्रकार सुरू आहेत. फळे, भाजीपाला कवडीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे, त्यामुळे ३१ मेच्या रात्री बारा वाजेपासून शेतकरी संपावर जाणार आहेत.
कर्जमुक्ती आणि हमीभाव घेण्यासाठी अकोला जिल्ह्यातील शेतकरीही १ जूनपासूनच्या संपात सहभागी होणार आहेत. त्यासाठीचे नियोजन आणि पुढील वाटचाल मूर्तिजापुरात ठरली आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी पुढे आले आहेत. सोबतच मराठा क्रांती मोर्चाही किसान क्रांतीसोबत असल्याचेही निश्चित झाले आहे.
भाजप शासनाच्या काळात आत्महत्यांच्या प्रमाणात ४० टक्के वाढ झाली. शासनाला आणखी किती बळी हवे आहेत, सातव्या वेतन आयोगाला, समृद्धी महामार्गासाठी निधी आहे, शेतकऱ्यांसाठी का नाही, असा विचार आता शेतकरी करीत आहेत. त्या प्रश्नांच्या उत्तरातच शासनाची शेतकऱ्यांविषयी असलेली कळकळ स्पष्ट होते. स्वामिनाथन आयोग लागू करू, सात-बारा कोरा करू, हे मुद्दे निवडणूकपूर्व जाहीरनाम्यात भाजपने घेतले होेते. आता विधानसभेत कर्जमुक्तीचा ठराव का मांडला जात नाही, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच एक जूनपासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे रविवारी मूर्तिजापूर येथे किसान क्रांतीचे प्रदेश समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, आठ तास मोफत वीज, मोफत ठिबक, दुधाला ५० रुपये लीटर हमीभाव, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा, फळे व भाजीपाल्यास हमीभाव, स्वामिनाथन आयोग, उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा धरून हमीभाव, शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे, या मागण्यांसाठी हा संप केला जात आहे.
त्याचवेळी मंत्रीपद सोडून येत असतील तर सदाभाऊंनाही सोबत घेतले जाईल, असेही किसान क्रांतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे विजय काकडे, प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके, जनमंचचे प्रा. सुधाकर गौरखेडे, अरुण बोंडे, राजू पाटील वानखडे, शेतकरी नेते प्रकाश बोनगिरे, विजय लोडम, देवीदास बांगड, पुंडलिकराव भारंबे, शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख सुरेश जोगळे, प्रा.पी.एम. पाटील यावेळी उपस्थित होते.