शेतकरी संपावर जाणार!
By Admin | Updated: May 30, 2017 20:07 IST2017-05-30T20:07:53+5:302017-05-30T20:07:53+5:30
३१ मेच्या रात्री बारा वाजेपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. शासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा किसान क्रांती प्रदेश समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी दिला.

शेतकरी संपावर जाणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. लागवडीचा खर्च निघेनासा झाला आहे. शासनाचे धोरण कळायला मार्ग नाही. विदेशातून धान्य, कडधान्य आयातीचे प्रकार सुरू आहेत. फळे, भाजीपाला कवडीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे, त्यामुळे ३१ मेच्या रात्री बारा वाजेपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. कर्जमुक्ती व हमीभाव घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही. या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा देत किसान क्रांती प्रदेश समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी यांनी शासनावर सडकून टीका केली.
निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासने देण्यात आली होती. मग आता भाजप शासन कर्जमुक्तीबाबत विधानसभेत कर्जमुक्तीचा ठराव का मांडत नाही. सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, दुधाला ५० रुपये लिटर हमीभाव, मोफत ठिबक सिंचन, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करून वीज बिल माफ करा, आदी मागण्यांसाठी शेतकरी संपावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात दूध व भाजीपाला यांचा पुरवठा बंद करण्यात येणार असून, इतर राज्यातून होणारा पुरवठादेखील थांबविला जाणार आहे. प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मत्रीपद सोडून सदाभाऊ खोत आमच्यासोबत आले तर त्यांना सोबत घेऊ. या पत्रकार परिषदेला डॉ. श्रीकांत तिडके, अरुण बोंडे, सुरेश जोगळे, राजू पाटील वानखडे, प्रकाशअण्णा बोनगिरे, देवीदास बांगड, पुंडलीकराव भारंबे, प्रा. पी. एम. पाटील, प्रा. सुधाकर गौरखेडे उपस्थित होते.