मुलीच्या वाढदिवशी शेतक-यांना मदतीचा हात!
By Admin | Updated: November 24, 2015 01:52 IST2015-11-24T01:52:43+5:302015-11-24T01:52:43+5:30
जिल्हाधिका-यांनी जोपासली ‘शाश्वत’ सामाजिक बांधीलकी.

मुलीच्या वाढदिवशी शेतक-यांना मदतीचा हात!
अकोला: मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करतानाच दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या मदतीसाठी दहा हजार रुपये मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देऊन, जिल्हाधिकारी दाम्पत्याने सोमवारी 'शाश्वती'चा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे 'कन्ये'चा सन्मान करीत शेतकर्यांना मदतीचा हात देणार्या जिल्हाधिकारी दाम्पत्याने सामाजिक बांधीलकी जपल्याचा प्रत्यय आला. अकोल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची कन्या 'शाश्वती'चा सोमवारी पहिला वाढदिवस होता. मुलीचा वाढदिवस हर्षोल्हासात साजरा करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी दाम्पत्याने केले होते; मात्र मुलीचा वाढदिवस साजरा करीत असताना, दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला असताना जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, त्यांची पत्नी सोनम 'शाश्वती'सह सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात आले. मुलीच्या वाढदिवसाला शेतकर्यांच्या मदतीसाठी दहा हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता जिल्हाधिकारी दाम्पत्याने निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केला. कन्येचा वाढदिवस साजरा करतानाच दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून दहा हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देऊन, जिल्हाधिकारी दाम्पत्याने सामाजिक बांधीलकी जपल्याचा प्रत्यय आणून दिला.