रब्बी पीक विम्यातही शेतक-यांची निराशा
By Admin | Updated: February 2, 2016 01:51 IST2016-02-02T01:51:27+5:302016-02-02T01:51:27+5:30
दुष्काळात पीक नुकसानभरपाईचा लाभ अत्यल्प.

रब्बी पीक विम्यातही शेतक-यांची निराशा
संतोष येलकर/अकोला: गतवर्षीच्या रब्बी हंगामातील हरभरा व गहू पिकाच्या नुकसानभरपाईपोटी शेतकर्यांना देण्यात येत असलेल्या विमा रकमेचा लाभ अत्यल्प असल्याने दुष्काळी परिस्थितीत रब्बी पीक विम्यातही शेतकर्यांची निराशा झाली आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षीदेखील अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील विविध भागांमध्ये दुष्कळी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी शेतकरी हवालदिल झाला. गतवर्षीच्या रब्बी हंगामात अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील शेतकर्यांनी प्रामुख्याने हरभरा, गहू, कांदा व इतर पिकांचा विमा काढला होता. पीक विमा हप्त्याची रक्कम भरून, राष्ट्रीय कृषी विमा कंपनीकडून शेतकर्यांनी पीक विमा उतरविला. दुष्काळी परिस्थितीत रब्बी पीक नुकसानभरपाईपोटी पीक विमा रकमेचा आधार मिळेल, अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. हरभरा, गहू व इतर रब्बी पिकांच्या नुकसानभरपाईपोटी पीक विम्याची रक्कम अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय कृषी विमा कंपनीमार्फत संबंधित बँकांना प्राप्त झाली. अकोला जिल्ह्यात हरभरा पीक विम्यापोटी एकरी ५८१ रुपये ते २ हजार ९५४ रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. महसूल मंडळनिहाय देण्यात येणार्या पीक नुकसानभरपाईमध्ये काही तालुक्यांमध्ये पीक विम्याची अत्यल्प रक्कम प्राप्त झाली आहे. अशीच स्थिती विभागातील इतर जिल्ह्यांमध्येही आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत हरभरा पीक विमा काढलेल्या शेतकर्यांनी एकरी ३00 रुपये प्रमाणे विमा हप्त्याची रक्कम भरली असून, त्यापोटी एकरी ५८१ रुपये ते २ हजार ९५४ रुपयांपर्यंंत पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत रब्बी पीक विम्यापोटी कमी रकमेचा लाभ मिळल्याने, शेतकर्यांची निराशा झाली आहे.