शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा लढा कायम!
By Admin | Updated: May 16, 2017 02:16 IST2017-05-16T02:16:06+5:302017-05-16T02:16:06+5:30
शिवसेना शिवसंपर्क अभियान : उद्धव ठाकरे यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा लढा कायम!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कर्जाच्या खाईत बुडालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा लढा कायम सुरू राहील. तुम्ही हताश होऊ नका, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे सांगत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव देणे तर सोडाच त्यांच्या तुरीची खरेदी करण्यास सरकार जाणीवपूर्वक आखडता हात घेत असल्याचे सांगत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कैफियत मांडली. शिवसंपर्क अभियानच्या निमित्त अकोल्यात दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी स्थानिक विश्रामगृह येथे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी दाखल झाले होते. ठाकरे यांचे आगमन होताच त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी अकोट, बाळापूर, पातूर तसेच अकोला तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणलेला सुताचा हार भेट म्हणून देताच ठाकरे यांनी नतमस्तक होऊन हार स्वीकारला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित शेतकऱ्यांची नावे लिहून घेतली. याप्रसंगी संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत, आ. गोपीकिशन बाजोरिया, श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य महादेवराव गवळे आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले...
आम्ही सरकारमध्ये भाजपच्या सोबत असलो तरी तुमच्या समस्यांवर तोडगा निघत नसेल तर आमचा सरकारच्या धोरणांना तीव्र विरोध राहील आणि आहे. तूर खरेदीवरून सरकारने मारलेल्या कोलांटउड्या पाहता एकप्रकारे चेष्टा करण्यात आल्याचे दिसून येते. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या समस्या जोपर्यंत निकाली निघणार नाहीत तोपर्यंत सरकारला झोपू देणार नसल्याचे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
या शेतकऱ्यांनी साधला संवाद
अकोला तालुक्यातून म्हैसांग येथून मोहन काळे, रामकृष्ण साटोटे, अजित देशमुख, ज्ञानेश्वर गावंडे, पातूर नंदापूर येथून गिरीश गवळी, आगर येथील पंकज काळणे तसेच पातूर तालुक्यातील गजानन घुले, भारत अंभोरे, दत्तराव घुगे, दशरथ आढोळकर, रामदास आढोळकर, रामदास बोडणे, रमेश लाडकर, कन्नू पांडे तसेच बाळापूर तालुक्यातील विनायक लोड, गोवर्धन करनकर, डिगांबर शिंदे, वसंत नागे, नारायण लोड, आनंद थोरात यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला.
काय म्हणाले शेतकरी?
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. गतवर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतीच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली. सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता; परंतु ज्या पद्धतीने भाजप सरकारने तूर खरेदी करताना शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे सोयाबीन, तूर घरात पडून आहे. कांद्याच्या पेरणीला लागलेला खर्च व मिळालेला भाव पाहता नाइलाजाने कांदा फेकून देण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. अघोषित भारनियमनामुळे सिंचनावर परिणाम झाल्याची समस्या शेतकऱ्यांनी मांडली.
शेतकऱ्यांची निवड करा!
येत्या १९ मे रोजी नाशिक येथे शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातून तीन शेतकऱ्यांची निवड करण्याचा आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिला.