महावितरणच्या कार्यालयावर धडकले शेतकरी
By Admin | Updated: April 26, 2017 02:00 IST2017-04-26T02:00:19+5:302017-04-26T02:00:19+5:30
कुरुम : मधापुरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कमी दाबामुळे पिके संकटात सापडली आहेत.

महावितरणच्या कार्यालयावर धडकले शेतकरी
कुरुम : मधापुरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कमी दाबामुळे पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे त्रस्त ४० ते ५० शेतकऱ्यांनी कुरुम येथील महावितरणच्या उपकेंद्रावर धडक दिली; मात्र तेथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने शेतक ऱ्यांनी आपली कैफियत आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे मांडली.
मधापुरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून कृषी पंपांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे, तसेच अनेक वेळा विजेचा लपंडाव होत असल्याने शेतकऱ्यांना आपली उन्हाळी पिके वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सध्या मधापुरी परिसरात उन्हाळी भुईमूग, पालेभाज्या, फळबागा आदी आहेत. परिसरात पाणी मुबलक प्रमाणात आहे. आपली पिके वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी गावठान फिडरवरून कृषी पंपांचा वीज पुरवठा घेतला आहे. त्यामुळे कु रुम आणि मधापुरी येथे वीज पुरवठा खंडित होत आहे. मधापुरी येथे पाणीपुरवठा योजनेवरीही परिणाम झाला होता. याविषयी कुरुम येथील उपकेंद्रावर शेतकऱ्यांनी धडक दिली होती; मात्र तेथे कुणीही उपस्थित नसल्याने आमदार पिंपळेंकडे शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. यावेळी आमदार पिंपळेंनी गावठान फिडरवरील कृषी पंपांच्या जोडण्या काढण्याचे आदेश वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. महिनाभरात वीज पुरवठा सुरळीत करण्याचा तसेच उच्च दाबाचा प्रश्न सोडविण्याचेही निर्देश दिले. यावेळी क. अभियंता यांनी पोलीस बंदोबस्तात कृषी पंपाचा वीज पुरवठा कापण्यात आला.
या कारवाईमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार असला, तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र नुकसान होणार आहे.