शेतक-यांना आता मदतीची आस
By Admin | Updated: November 11, 2015 01:56 IST2015-11-11T01:56:23+5:302015-11-11T01:56:23+5:30
अकोलाजिल्हय़ातील सर्वच गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती.

शेतक-यांना आता मदतीची आस
अकोला: अत्यल्प पावसामुळे पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याच्या स्थितीत जिल्हय़ातील लागवडीयोग्य सर्वच ९९७ गावांमधील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जिल्हय़ातील सर्वच गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी, शासनाकडून मदत केव्हा जाहीर केली जाते, याबाबतची आस आता दुष्काळग्रस्त शेतकर्यांना लागली आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, नापिकीच्या स्थितीत जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षीदेखील पावसाने दगा दिला असून, अत्यल्प पावसामुळे जिल्हय़ात मूग, उडिदाचे पीक बुडाले. सोयाबीन उत्पादन सरासरी एकरी एक ते दीड क्विंटल झाले. कपाशी पिकाचे उत्पादनही एकरी चार क्विंटलच्या वर होणार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे नापिकीच्या स्थितीत जिल्हय़ातील शेतकरी संकटात सापडला आहे. प्रत्यक्ष पीक परिस्थिती आणि उत्पादनाच्या आधारे जिल्हय़ातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी गत शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्हय़ातील खरीप पिकांची सरासरी पैसेवारी ४२ पैसे आहे. खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट आहे. जिल्हय़ातील सर्वच गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आली आहे; मात्र दुष्काळी गावांना सवलती व दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी मदत शासनामार्फत अद्याप जाहीर करण्यात आली नाही.