केळी उत्पादकांच्या नुकसानाची कृषिमंत्र्यांकडून कबुली!
By Admin | Updated: March 18, 2016 02:13 IST2016-03-18T02:13:37+5:302016-03-18T02:13:37+5:30
आमदारांच्या तारांकित प्रश्नावर उत्तर; तपास प्रगतीपथावर असल्याची दिली माहिती.

केळी उत्पादकांच्या नुकसानाची कृषिमंत्र्यांकडून कबुली!
अकोला : केळीचे निकृष्ट व बोगस बियाणे देऊन आकोट तालुक्यातील केळी उत्पादकांची फसवणूक करण्यात आली असून, यात शेतकर्यांचे ७0 टक्के नुकसान झाले असल्याची कबुली राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. आमदार रणधीर सावरकर आणि आ. प्रकाश भारसाकळे यांच्यासह आ. विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात कृषिमंत्र्यांनी केळी उत्पादकांच्या नुकसानाची कबुली दिली.
आकोट तालुक्यातील आंबोडा येथील शेतकर्यांनी जून ते जुलै २0१५ दरम्यान केळी पिकाची लागवड केली. सदर बियाणे रमेश रामचंद्र आकोटकर यांच्यासह दोघांच्या गणराज केला ग्रुप या दुकानातून घेतले. इंद्रायणी जातीचे बियाणे मिळण्यासाठी त्यांनी आगाऊ बुकिंग केले होते; मात्र इंद्रायणी जातीचे बुकिंग केल्याची पावती असताना दुसर्याच कंपनीचे बेणे पुरविण्यात आले. याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अकोला पूर्वचे आमदर रणधीर सावरकर आणि आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर उत्तर देताना शेतकर्यांना केळीची निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरविण्यात आल्याने त्यांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल तालुकास्तरीय निवारण समितीच्या अहवालात नमूद असल्याचे कृषिमंत्र्यांनी त्यांच्या लेखी उत्तरात सांगितले. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, तपास प्रगतीपथावर असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.