शेतकरी सुखावला
By Admin | Updated: September 1, 2014 01:44 IST2014-09-01T01:41:26+5:302014-09-01T01:44:52+5:30
अकोला जिल्ह्यात दमदार पाऊस; २४ तासात अतवृष्टीचा इशारा; धरण पातळी मात्र जैसे थे.

शेतकरी सुखावला
अकोला : पावसाळा सुरु झाल्यापासून एक-दोन दिवस वगळता दडी मारून बसलेल्या पावसाला शनिवारी रात्रीपासून पुन्हा सुरुवात झाली. रविवारी दिवसभर जिल्ह्यात दमदार हजेरी लावणार्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला आहे. हा पाऊस सोयाबीन आणि कपासीच्या पिकांसाठी उपयुक्त आहे.
शनिवारी मध्यरात्रीपासूनच दमदार पावसाचा सुरुवात झाली. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते, दुपारी २.३0 वाजतापासून पाऊस पुन्हा सुरू झाला. जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, मूर्तिजापूर, तेल्हारा या सातही तालुक्यात सार्वत्रिक दमदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. रात्री ८.३0 वाजेपर्यंत अकोला शहरात १७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. पावसाळा सुरू झाल्यापासूनच जिल्ह्यातील शेतकरी सार्वत्रिक पावसाच्या प्रतीक्षेत होता. रविवारी जिल्हय़ात सार्वत्रिक आणि दमदार पावसाने हजेरी लावली. रात्री ८ वाजेपर्यंंत पाऊस सुरूच होता. बरसणारा पाऊस पिकांसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठय़ातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२४ तासांत अतवृष्टीचा इशारा!
४येत्या २४ तासांत विदर्भातील सर्व जिल्ह्यात अतवृष्टी होण्याची शक्यता नागपूर येथील वेधशाळेने व्यक्त केली आहे. यासंदर्भात रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना प्राप्त झाली. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकार्यांनाही दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.