बनावट सोने गहाण ठेवणारा गजाआड
By Admin | Updated: August 3, 2016 02:12 IST2016-08-03T02:12:34+5:302016-08-03T02:12:34+5:30
सोन्याचे पॉलिश देऊन ते एका फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवण्याचा प्रयत्न करणा-या आणखी एका आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
_ns.jpg)
बनावट सोने गहाण ठेवणारा गजाआड
अकोला: चांदीच्या दागिन्यांना सोन्याचे पॉलिश देऊन ते एका फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवण्याचा प्रयत्न करणार्या आणखी एका आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सुरेश अंबादास महाले असे आरोपीचे नाव आहे. तर शनिवारी अटक केलेल्या आरोपीची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.
वाशिम येथील पुसद नाका परिसरातील रहिवासी तुकाराम रामेश्वर महाले याने गांधी रोडवर असलेल्या इंडिया फायनान्स कंपनीमध्ये जाऊन ३३ ग्रॅमच्या तीन सोन्याच्या रिंग गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र शाखा व्यवस्थापक राहुल श्यामराव गंगाडे यांनी सोन्याच्या रिंग तपासणीसाठी सोनाराकडे पाठविल्यानंतर त्या बनावट असल्याचे समोर आले. चांदीच्या असलेल्या दागिन्यांवर सोन्याचे पॉलिश देऊन ते दागिने गहाण ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे गंगाडे यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणाची माहिती तत्काळ सिटी कोतवाली पोलिसांना दिली. यासोबतच कंपनीच्या वाशिम येथील शाखेशी संपर्क साधला असता महाले याने कंपनीच्या वाशिम शाखेतही बनावट सोने ठेवून ९0 हजार रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले. या प्रकरणी राहुल गंगाडे यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी तुकाराम महाले याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणातील सूत्रधार सुरेश अंबादास महाले यालाही मंगळवारी अटक केली. या फसवणूक प्रकरणात आता दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.