‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’
By Admin | Updated: May 4, 2015 01:21 IST2015-05-04T01:21:34+5:302015-05-04T01:21:34+5:30
अकोला येथे शंकरबाबा पापळकर यांच्या सोळाव्या मानसकन्येचा विवाह सोहळा.

‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’
विवेक चांदूरकर/ अकोला: केंद्र व राज्यातील मंत्री, आजी-माजी आमदार, सर्वपक्षीय नेते, बहुतांश खात्याचे अधिकारी, विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले समाजसुधारक व हजारो वर्हाडींच्या उपस्थितीत शंकरबाबा पापळकर यांच्या सोळाव्या मानसकन्येचा विवाह सोहळा मोठय़ा थाटात रविवारी सायंकाळी मराठा मंडळ कार्यालयात पार पडला. हा सोहळा नयनरम्य होता, उपदेशात्मक होता, ऊर्जात्मक होता. जीवनाला दिशा व जगण्याला उद्देश देणारा ठरला.
स्व. अंबादास पंत वैद्य अपंग बालगृह वझ्झर ता. अचलपूर या संस्थेचे सचिव शंकरबाबा पापळकर यांची सोळावी मानसकन्या कांती हिचा विवाह सोहळा बाळापूर येथील मोतीलाल डोळसकर यांचा मुलगा धनंजय यांच्याशी रविवारी सायंकाळी पार पडला. ३ मे रोजी अकोल्यात ४३ डिग्री तापमान होते. मात्र, या तापमानातही लोकांना ओढ होती ती मराठा मंडळ कार्यालयात पार पडणार्या विवाह सोहळ्याची. सायंकाळ होताच लोकांची गर्दी जमत होती. मराठा मंडळ मंगल कार्यालय लोकांनी फुलत होते. शंकरबाबा पापळकर स्वत: बॅन्डच्या आवाजात येणार्या पाहुण्यांचे स्वागत करीत होते. त्यांना मंगल कार्यालयाच्या आतमध्ये सोडत होते.
या सोहळ्याला केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, विभागीय उपायुक्त रवींद्र ठाकरे, आ. रणधीर सावरकर, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शंकरबाबा पापळकर यांच्यापासून आम्हाला समाजकार्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन हंसराज अहीर यांनी यावेळी केले.