ऑटाेचालकांची नेत्र तपासणी केल्याने काही दृष्टिदोष असतील तर ते एखादी दुर्घटना होण्यापूर्वीच लक्षात यावे व पर्यायाने योग्य उपचार होऊन सदर दृष्टिदोष दूर करण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे. अपघात टाळता यावे म्हणून, ऑटोचालकांसाठी रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून स्थानिक जुना कॉटन मार्केट येथील नेत्र कमलांजली हॉस्पिटल येथे नेत्र तपासणी शिबीर आयाेजित केले हाेते. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व नेत्र कमलांजली चॅरिटेबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रकांत पानपालिया यांच्या प्रमुख उपस्थीतीत हे शिबीर घेण्यात आले. हेे शिबीर पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
एक महिना चालणार शिबीर
ऑटोचालकांसाठी आयोजित नेत्र चिकित्सा शिबीर १५ फेब्रुवारीपर्यंत सुरूच राहणार आहे. गरज वाटल्यास सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २२ जानेवारी राेजी या शिबिरास प्रारंभ करण्यात आला. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ, नेत्र कमलांजली चॅरिटेबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. पानपालिया, सचिव डॉ. श्याम पानपालिया, सहसचिव सुरेश रांदड, डॉ. आशिष पानपालिया उपस्थित होते.