हद्दवाढीच्या हालचाली सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 03:07 IST2016-08-27T03:07:52+5:302016-08-27T03:07:52+5:30
मुंबई नगरविकास विभागाद्वारे ३0 ऑगस्टपर्यंत निघणार अधिसूचना.

हद्दवाढीच्या हालचाली सुरू!
अकोला, दि. २६: महापालिकेच्या हद्दवाढीसाठी शासन स्तरावर नगर विकास विभागात हालचालींना वेग आला आहे. हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होताच ३0 ऑगस्टपर्यंत हद्दवाढीची अधिसूचना जारी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू झाल्याची माहिती आहे.
फेब्रुवारी २0१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडेल. चार नगरसेवकांचा मिळून एक प्रभाग, याप्रमाणे प्रभागांची पुनर्रचना होणार असून प्रभागाचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. येत्या १२ सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. या धामधुमीत महापालिकेच्या हद्दवाढीचेही भिजत घोंगडे निकाली काढण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मनपाची २00१ मध्ये स्थापना झाल्यानंतर चक्क पंधरा वर्षांपर्यंत हद्दवाढीसाठी प्रशासकीय व राजकीय स्तरावर प्रयत्नच झाले नाहीत. शहरालगतच्या गावांचा महापालिकेच्या सुविधांवर ताण पडत असण्यासोबतच भौगोलिकदृष्ट्या मनपा क्षेत्राची हद्दवाढ करणे आवश्यक आहे. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शहरानजीकच्या २४ गावांचा समावेश करीत हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर केला. हद्दवाढीच्या हरकती-सूचना निकाली काढल्यानंतर आता केवळ शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. यादरम्यान, कोणत्याही परिस्थितीत १ सप्टेंबरपर्यंत हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत निवडणूक आयोगाने राज्य शासनाला दिल्यानंतर नगर विकास विभागात हद्दवाढीच्या संदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात येत्या २९ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त अजय लहाने यांना नगर विकास विभागात उपस्थित राहण्याची सूचना आहे. शासनाच्या हालचाली पाहता ३0 ऑगस्टपर्यंत हद्दवाढीची अधिसूचना जारी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.