लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील एका नावाजलेल्या पेट्रोल पंप संचालकाने कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण केले असून, भविष्य निर्वाह निधी कार्यालयात मोजक्या कर्मचाऱ्यांची नोंद नाममात्र दाखविली आहे. ही बाब १५-२० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी कर्मचारी भविष्य निधी कार्यालय आणि सहायक कामगार आयुक्त कार्यालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी पेट्रोल पंप कर्मचारी हेमंत विनायकराव भटुरकर यांनी केली आहे.इंडियन आॅइल डीलर कंपनीच्या पेट्रोल पंपावर १९९८ पासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मालकाने सातत्याने शोषण केले आहे. जास्त वेतन दाखवून प्रत्यक्षात कमी वेतन देणे, भविष्य निर्वाह कार्यालयात कर्मचाऱ्यांची नोंद केली नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी उपायुक्त कार्यालयात धाव घेतली. अनेकांना या कार्यालयात नोंद नसल्याचे कळले. त्यामुळे पेट्रोल पंप मालकाने काही कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटिस न देता कामावरून काढून टाकले. त्यानंतर हेमंत विनायक भटुरकर या कर्मचाऱ्याने सहायक कामगार आयुक्त आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे लेखी स्वरूपात तक्रार नोंदविली. वर्षोगणतीपासून सुरू असलेल्या या लुटीची तक्रार अनेक वर्षांपासून केली असली, तरी अजूनही कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. पेट्रोल पंप संचालकांकडून सुरू असलेल्या शोषणाचे अनेक बळी असून, याप्रकरणी शासन स्तरावर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित पेट्रोल पंप संचालकास संपर्क साधला असता, त्यांनी सदर पेट्रोल पंपाची विक्री केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मागील विषयावर मी बोलू शकत नाही, असे त्यांना म्हटले आहे. आता निराधार झालेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अकोल्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर हीच स्थिती असल्याचा आरोपही या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
पेट्रोल पंप संचालकांकडून कर्मचाऱ्यांचे शोषण
By admin | Updated: May 25, 2017 01:18 IST