सहा लाखांची वीज चोरी उघड
By Admin | Updated: August 1, 2016 01:14 IST2016-08-01T01:14:28+5:302016-08-01T01:14:28+5:30
१६ वीज ग्राहक पकडले; महावितरणची बाश्रीटाकळी, पिंजर येथे कारवाई.

सहा लाखांची वीज चोरी उघड
अकोला/बाश्रीटाकळी : महावितरणच्या अकोला ग्रामीण मंडळाच्या भरारी पथकांनी बाश्रीटाकळी उपविभागात शनिवारी केलेल्या कारवाईत सहा लाखांची वीज चोरी उघड झाली आहे. बाश्रीटाकळी शहर व पिंजर येथे ६0 घरगुती व व्यावसायिक वीज ग्राहकांची तपासणी करण्यात आली. यापैकी बाश्रीटाकळी येथे १0 तर पिंजर येथे ६ वीज ग्राहकांनी वीज चोरी केल्याचे उघड झाले. महावितरणने वीज चोरी करणार्यांना दंड ठोठावला आहे.
महावितरणच्या अकोला परिमंडळात वीज चोरीचे प्रमाण वाढत आहे. अकोला ग्रामीण विभागात वीज चोरी होत असल्याच्या तक्रारी महावितरणला प्राप्त झाल्या आहेत. वीज चोरीला आळा घालण्यासाठी अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम हाती घेण्यात आली असून, सात भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत. ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांच्या नेतृत्वात शनिवारी बाश्रीटाकळी शहर व पिंजर येथे कारवाई करण्यात आली. यावेळी भरारी पथकांनी व्यावसायिक व घरगुती अशा एकूण ६0 वीज ग्राहकांच्या मीटर व वीज पुरवठय़ाची तपासणी केली.
१६ वीज ग्राहकांकडे सहा लाखांची वीज चोरी झाल्याचे उघड झाले. भारतीय वीज कायद्याच्या कलम १२६ अंतर्गत (विजेचा अनधिकृत वापर) २ वीज ग्राहकांवर, तर कलम १३५ अंतर्गत (थेट वीज चोरी) १४ जणांवर कारवाई करण्यात आली. भरारी पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन जानोकार, बाश्रीटाकळीचे उप कार्यकारी अभियंता संतोष राठोड, अभियंता विनायक जामकर अभियंता कातोडे यांचा समावेश आहे.