जिल्हास्तर पोलीस क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन
By Admin | Updated: August 23, 2016 00:59 IST2016-08-23T00:59:55+5:302016-08-23T00:59:55+5:30
अकोला जिल्ह्यातील १0३ खेळाडूंचा सहभाग; तीन दिवस चालणार स्पर्धा.

जिल्हास्तर पोलीस क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन
अकोला, दि. २२: पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेमध्ये २0 महिला व ८३ पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्पर्धेत सहभागी पाच संघांच्या पथसंचलनाने झाली. पोलीस बॅण्ड पथकाच्या वाद्यवृंदाने देशभक्तीपर सुरेल धून वाजवून पथसंचलनाला साथ दिली. आरपीआय विकास तिडके यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन करण्यात आले. मुख्यालय संघाचे नेतृत्व शेषराव ठाकरे व अँथलिट मिताली राऊत यांनी केले. शहर विभागाचे नेतृत्व अँथलिट सय्यद आरीफ व राष्ट्रीय बास्केटबॉलपटू पूजा मंडाईतकडे होते. मूर्तिजापूर विभाग संघाने अँथलिट काकड व मीना धाबे यांच्या नेतृत्वात पथसंचलन केले. अकोला विभागाचे नेतृत्व कुस्तीगीर विजय दाते व अँथलिट पूजा वानखडे यांनी केले. बाळापूरचे नेतृत्व हॉकीपटू सुनील पाताडे व कबड्डीपटू वनिता खंडेराव यांनी केले. यानंतर गतवर्षी बेस्ट प्लेअर ठरलेले खेळाडू इम्रान आणि भाग्यश्री मेसरे यांनी क्रीडा मशाल मैदानाच्या चौफेर फिरू न प्रमुख अतिथींच्या जवळ दिली. चंद्रकिशोर मीणा व विजयकांत सागर यांच्याकडे मशाल सुपूर्द करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. प्रास्ताविक विजयकांत सागर यांनी केले. तीन दिवसीय या स्पर्धेत फुटबॉल, हॉकी, कबड्डी, बास्केटबॉल आदी खेळांचे सामने होणार असून, स्पर्धेत सवरेत्कृष्ट खेळाडू व संघाची निवड विभागीय स्पर्धेकरिता करण्यात येणार असल्याचे सागर यांनी सांगितले. मनात न्यूनगंड न बाळगता धैर्याने प्रत्येक गोष्टींचा सामना केल्यास निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो, अशा शब्दात मीना यांनी पोलीस खेळाडूंना मार्गदर्शन केले. यानंतर पोलीस क्रीडा स्पर्धा-२0१६ चे उद्घाटन झाल्याचे मीणा यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय फुटबॉलपटू संजय पटेकर यांनी केले.