अखेर तूर खरेदीला सुरुवात!
By Admin | Updated: March 30, 2017 03:17 IST2017-03-30T03:17:54+5:302017-03-30T03:17:54+5:30
बारदाना उपलब्ध; बुधवारी १३00 क्विंटल तुरीचे माप

अखेर तूर खरेदीला सुरुवात!
अकोला, दि. २९- आठवडाभरापासून बारदान्याअभावी बंद झालेली नाफेडची तूर खरेदी बुधवारी पुन्हा सुरू करण्यात आली. बारदाना उपलब्ध झाल्यामुळे नाफेडच्या अधिकार्यांनी तातडीने तूर खरेदीला प्रारंभ केला. बुधवारी अंदाजे १३00 क्विंटल तुरीचे माप झाल्याची माहिती नाफेडच्या अधिकार्याने दिली. गत दीड महिन्यांपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जिनिंगमध्ये नाफेडच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकर्यांकडून तूर विक्री होत आहे; परंतु बारदान्याअभावी अधूनमधून तूर खरेदी बंद करण्यात येते. २0 मार्च रोजी नाफेडकडील बारदाना संपल्यामुळे तूर खरेदी बंद करण्यात आली होती, त्यामुळे जिल्हय़ातील शेतकर्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत होता. बाजार समितीच्या आवारात सद्यस्थितीत १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक तूर मापाच्या प्रतीक्षेत पडून आहे. शेतकरीसुद्धा आठ दिवसांपासून बारदान्याची प्रतीक्षा करीत दिवस कंठित होता; परंतु बुधवारी बारदान्याचा ट्रक आल्यावर शेतकर्यांची तूर खरेदी सुरू करण्याची मागणी केली. शेतकर्यांची मागणी लक्षात घेता, नाफेडने बुधवारी दुपारपासून तूर खरेदी सुरू केली, त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला. दरम्यान शासनाने १५ एप्रिलपर्यंतच नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यातही शेतकर्यांना २५ क्विंटलचे बंधन घालून दिले आहे. २५ क्विंटलपेक्षा अधिक तूर खरेदी करणार नसल्याचे शासनाचे पत्र नाफेडला प्राप्त झाले असून, त्यानुसारच तूर खरेदी करण्यात येत आहे, तर दुसरीकडे राज्यमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकर्यांकडे तूर असेपर्यंत खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले, त्यामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रम आहे. रविवारपर्यंत पुरेल एवढाच बारदाना बुधवारी बारदाना घेऊन ट्रक आल्यानंतर शासकीय तूर खरेदी करण्यात आली आणि काही बारदाना नाफेडच्या इतरही केंद्रांवर पाठविण्यात आला. त्यामुळे नाफेडच्या केंद्रांकडे रविवारपर्यंत पुरेल एवढाच बारदाना आहे. रविवारी आणखी बारदाना येणार असल्याची माहिती नाफेडच्या अधिकार्याने दिली.