अखेर कट्यार येथील शेतक-याचा मृत्यू

By Admin | Updated: December 15, 2014 01:12 IST2014-12-15T01:12:52+5:302014-12-15T01:12:52+5:30

कट्यार येथील शेतक-याने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न.

Eventually, the death of the farmer in Katyar | अखेर कट्यार येथील शेतक-याचा मृत्यू

अखेर कट्यार येथील शेतक-याचा मृत्यू

अकोला - कर्ज आणि दुष्काळाच्या फेर्‍यात सापडलेल्या कट्यार येथील शेतकर्‍याने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पत्नीच्या जागरुकतेमुळे त्याला वाचविण्यात आले होते. सवरेपचार रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणार्‍या या शेतकर्‍याचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पत्नी आणि दोन मुलींचे छत्र हरविले असून, त्यांच्या उदरनिर्वाहासह कर्ज फेडण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कट्यार येथील रहिवासी गणेश शालीग्राम दंदी (४८) यांच्याकडे तीन एकर शेती असून, त्यांनी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३0 हजार रुपयांचे कर्ज घेऊन शेतात पेरणी केली. सोयाबीन आणि मूग पेरल्यानंतर थोड्या प्रमाणात पाऊस आला. चांगले पीक होण्याची अपेक्षा होती, मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने मूग होता त्याच अवस्थेत करपला. दीड एकरामध्ये ७0 ते ८0 किलो सोयबीन झाले आणि हरभरा पेरला तरी उगवण्याची शाश्‍वती नव्हती. त्यामुळे बँकेचे आणि एका खासगी व्यक्तीकडून घेतलेले कर्ज फेडणे तसेच संसाराचा गाडा पुढील एका वर्षापर्यंत चालविणे अशक्य वाटल्याने गणेश दंदी यांनी राहत्या घरात मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार त्यांची पत्नी शोभा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडा-ओरड केली. महिलेचा आवाज ऐकताच घराच्या आजूबाजूची मंडळी मदतीसाठी धावल्याने गणेश दंदी यांचे प्राण वाचले; त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र रविवारी सायंकाळी गणेश दंदी यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पत्नी, दोन मुलींना सोडून त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आत्महत्येने कुटुंबावरील संकट अधिक वाढले असून, दोन मुलींचा उदरनिर्वाह आणि कर्ज फेडण्याचा मोठा प्रश्न आता त्यांची पत्नी शोभा यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने मदत जाहीर केली आहे, मात्र शेतकर्‍यांना नेमकी किती मदत मिळणार, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकरी पुरता खचला असून, आजही आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे.

Web Title: Eventually, the death of the farmer in Katyar