मूर्तिजापुरात १७ जुलैपासून अतिक्रमण हटाव
By Admin | Updated: July 10, 2014 01:29 IST2014-07-09T18:08:42+5:302014-07-10T01:29:59+5:30
मूर्तिजापूर शहरात येत्या १७ जुलैपासून अतिक्रमण हटाव मोहीम

मूर्तिजापुरात १७ जुलैपासून अतिक्रमण हटाव
मूर्तिजापूर: अकोला शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या धर्तीवर मूर्तिजापूर शहरातही येत्या १७ जुलैपासून ही मोहीम हाती घेतल्या जाणार आहे. मूर्तिजापूर शहरातील प्रमुख चौक आणि मुख्य मार्गांवर अनेकांनी लहान-मोठे लाकडी व टिनाचे खोके बनवून आपला व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे आधीच अरूंद असलेले रस्ते चिंचोळे झाले आहेत. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या पृष्ठभूमीवर १७ जुलैपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. ध्वनीक्षेपकावरून जनतेला याबाबत सुचित करण्यात आले असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस.एस. टाले यांनी दिली आहे. नगर परिषद प्रशासनाचेवतीने जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार शहरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शासकीय जागेवर व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण त्यांनी स्वत:हून १७ जुलैपर्यंत काढावे अन्यथा नगर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमकांचे साहित्य जप्त करून नियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. सदर मोहिमेदरम्यान होणार्या आर्थिक नुकसानास अतिक्रमणधारक स्वत: जबाबदार राहतील, अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे.