अपक्ष बिघडवणार पक्षीय उमेदवारांची समीकरणे?
By Admin | Updated: October 6, 2014 01:45 IST2014-10-06T01:37:29+5:302014-10-06T01:45:44+5:30
पश्चिम वर्हाडात ११७ अपक्ष उमेदवार रिंगणात.

अपक्ष बिघडवणार पक्षीय उमेदवारांची समीकरणे?
राजरत्न सिरसाट/ अकोला
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारिप-बहुजन महासंघात बंडखोरी उफाळून आली असून, या विधानसभा निवडणुकीत तीन जिल्हय़ात ११७ अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. यात विद्यमान आमदारांसह पक्षांच्या पदाधिकार्यांचा समावेश आहे. यामुळे हे अपक्ष उमेदवार पक्षांच्या उमेदवारांची गोळाबेरीज बिघडवतात का, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.
या विधानसभा निवडणुकीत तीन जिल्हय़ातील १५ विधानसभा मतदारसंघातून ११७ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केलेली मतांची गोळाबेरीज हे अपक्ष बिघवडतात का, या दृष्टीने राजकीय विश्लेषक पाहत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारिप-बहुजन महासंघ या राजकीय पक्षात यावेळी बंडखोरी झाली आहे.
वाशिम जिल्हय़ातील कारंजा या मतदारसंघातील प्रकाश डहाके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत; परंतु यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात शड्ड ठोकला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघा तील राष्ट्रवादीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. वाशिम या विधानसभा मतदारसंघातून महिला काँग्रेसच्या पदाधिकारी डॉ. अल्का मकासरे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत.
अकोला पूर्व या विधानसभा मतदारसंघात भारिप-बमसंच्या नेत्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष पुष्पा इंगळे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या मतावर येथील भारिप-बमसंच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
मनसेचे माजी जिल्हाप्रमुख विजय मालोकार या मतदारसंघात पुन्हा अपक्ष लढत आहेत. या अगोदर दोनवेळा या मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. याच मतदारसंघातून भाजपाचा घटक पक्ष असलेल्या रिपाइं (आठवले) गटाचे अशोक नागदेवे निवडणूक रिंगणात आहेत.
मूर्तिजापूर या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीप्रमुख प्रतिभा अवचार अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. बाळापूर या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते नारायण गव्हाणकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. ते कुणबी समाजाचे असून, या मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे.
बुलडाणा जिल्हय़ातील बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शहरप्रमुख भगवान बेंडवाल यांनी शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश बाहेकर अपक्ष म्हणून रिंगणात आहे त. ते राकाँचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत.
जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातून सेवानवृत्त कार्यकारी अभियंता रमेश घोलप यांनी अ पक्ष उमेदवारी दाखल केली आहे. ते बारी समाजाचे असून, या मतदारसंघात बारी समाजाची लक्षणीय मते आहेत. या सर्व अपक्षामुळे राजकीय पक्षांचे उमेदवार धास्तावले असून, हे अपक्ष निवडून येतात की, राजकीय पक्षांच्या उमेदवाराचे गणित बिघडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.