नामांकित कॉलेजमधील प्रवेश हाऊसफुल्ल
By Admin | Updated: July 8, 2014 00:18 IST2014-07-08T00:18:38+5:302014-07-08T00:18:38+5:30
विद्यार्थ्यांची शोधाशोधा कराव्या लागणार्या महाविद्यालयांमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांनी स्वत:हून गर्दी केली.

नामांकित कॉलेजमधील प्रवेश हाऊसफुल्ल
अकोला : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर झालेला दहावीचा निकाल यंदा रेकॉर्डब्रेक होता. त्यामुळे विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची शोधाशोधा कराव्या लागणार्या महाविद्यालयांमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांनी स्वत:हून गर्दी केली. अकोला जिल्ह्यात जवळपास १४0 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये अकराव्या वर्गासाठी २३ हजार २२0 जागा आहेत. यावर्षी उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची संख्या २१ हजार ५0५ इतकी आहे. उत्तीर्ण होणार्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिले तरी १ हजार ७१५ इतक्या जागा रिकाम्या राहणार आहेत.
दहावीचा ऑनलाईन निकाल १७ जूनला जाहीर झाला. निकालाच्या दुसर्या दिवशीपासूनच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी सुरू केली. २६ जूनला गुणपत्रिका मिळाल्यानंतर अकरावीत प्रवेशासाठी गर्दी अधिक वाढली. शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांंनी यावर्षी चांगलाचा जोर लावला. मागील काही वर्षांपासून कोचिंग क्लासेसवालेदेखील महाविद्यालयाच्या व्यवसायात उतरले आहेत. शहरातील काही कोचिंग क्लासेसच्या मालकांनी स्वत: महाविद्यालये सुरू केली आहेत. स्वत:च्या कॅप्सूल बॅचेस या महाविद्यालयांमध्ये घेण्यात येतात. त्यामुळे ही महाविद्यालये केवळ नावापुरतीच असून, ट्यूशनचे अड्डे बनले आहेत. चांगले गुण असलेल्या ठरावीक मुलांनाच या महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे महाविद्यालयांचा निकाल नेहमीच चांगला लागतो. परिणामी या महाविद्यालयांमध्येदेखील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांंचा ओढा वाढला आहे.
काही वर्षांंपूर्वी शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांंमध्ये चढाओढ राहत असे; परंतु कोचिंग क्लासेसचा व्यवसाय जसा वाढला, तसे महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांंची गर्दी ओसरली. आता केवळ नावापुरती अँडमिशन असली म्हणजे झाले, असे मन विद्यार्थ्यांंनी बनविले आहे. त्यामुळेच त्यांचा ओढा कोचिंग क्लासेसवाल्यांच्या महाविद्यालयांकडे वाढला आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत जवळपास १४0 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये १ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ७ जुलैपासून पहिल्या यादीत नाव असणार्यांचे प्रवेश सुरू झाले. ११ जुलैपासून प्रतीक्षा यादीत नाव असणार्या विद्यार्थ्यांंचे प्रवेश सुरू होणार आहेत. १५ जुलैपर्यंंत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात अकरावीच्या २३ हजार २२0 जागा असून, यावर्षी २१ हजार ५0५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांंपेक्षा दोन हजार जागा जास्त आहेत. त्यातही अनेक विद्यार्थी आयटीआय, तंत्रनिकेतमध्ये (पॉलिटेक्निक) प्रवेश घेतात.
जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंपेक्षा दोन हजार जागा जास्त असल्या तरीही विद्यार्थी व पालक नामांकित विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी धाव घेतात. त्यामुळे काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांंची झुंबड उडत आहे तर काही विद्यालयांना विद्यार्थी मिळत नाही आहेत.