अभियंता ते आमदार
By Admin | Updated: October 23, 2014 01:57 IST2014-10-23T01:57:24+5:302014-10-23T01:57:24+5:30
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित उच्चशिक्षित आमदार रणधीर सावरकरांचा प्रवास.

अभियंता ते आमदार
डॉ. किरण वाघमारे / अकोला
विधानसभेच्या अकोला पूर्व मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर हे जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांमध्ये सर्वाधिक शिक्षित आहेत. प्रॉडक्शन इंजिनिअर असलेल्या सावरकर यांनी आयुष्यातील पहिल्याच निवडणुकीत प्रस्थापित उमेदवारांना धूळ चारली.
अकोला तालुक्यातील पळसो बढे येथील रहिवासी असलेले रणधीर सावरकर व्यवसायाने अभियंता आहेत. पळसो येथे मामाच्या गावीच त्यांचे वडील प्रल्हादराव सावरकर स्थायिक झाले. सावरकर यांचे बालपण पळसो बढे येथेच गेले. बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी रालतो विज्ञान महाविद्यालयात तर अभियांत्रिकी शिक्षण शिवाजी महाविद्यालयात घेतले. सुरुवातीपासून सावरकर यांचे मामा, खासदार संजय धोत्रे यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्त्यांच्या मार्गदर्शनात सावरकर यांनी वाटचाल सुरू केली. त्याचप्रमाणे आईदेखील त्यांच्यासाठी प्रेरणादायी होती. खा. धोत्रेंप्रमाणे त्यांनीही अभियंता बनण्याचे ठरविले आणि बारावीनंतर अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला. ह्यप्रॉडक्शनह्ण या शाखेत त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.ई. केले.
सावरकर यांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभूत्व आहे. ह्यप्रॉडक्शनह्ण सावरकर अभियांत्रिकी पदवी मिळविल्यानंतरही त्यांच्या आवडीचा विषय ह्यमाहिती आणि तंत्रज्ञानह्ण हाच राहिला. आपल्या आवडीलाच पुढे त्यांनी संगणक विक्रीच्या व्यवसायात रूपांतरित केले. सुरुवातीला काही काळ त्यांनी संजय धोत्रे यांच्या फॅक्टरीची धुरा सांभाळली. पुढे त्यांनी भावाचा संगणक व्यवसाय सांभाळला. आजही त्यांचे अकोल्यात मूर्तिजापूर रोडवर संगणक व त्याच्याशी संबंधित वस्तू विक्रीचे दुकान आहे. संगणक प्रशिक्षणाचे केंद्रदेखील त्यांनी अनेक दिवस चालविले.
संगणक विक्रीचा व्यवसाय करणारे सावरकर एक उत्तम शेतकरीदेखील आहेत. जैनपूर पिंपळोद आणि पळसो बढे येथे त्यांची शेती आहे. आजही ते उपलब्ध वेळेनुसार शेतीची कामे आवडीने करतात. १४ एप्रिल १९७३ रोजी जन्मलेले सावरकर हे जिल्ह्यातील सर्वात तरुण आमदार आहेत. वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांना आमदारकी मिळाली. सध्या ते अकोल्यातील राऊतवाडी परिसरात राहतात. भाजपाचे कुठलेही आंदोलन असो वा कार्यक्रम अग्रभागी राहून ते यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपला व्यवसाय, शेती आणि राजकारणापलीकडे जाऊन एक कुटुंबवत्सल माणूस म्हणूनदेखील त्यांची ओळख आहे. पत्नी मंजूषा, एक मुलगा आणि एक मुलगी असे त्यांचे कुटुंब आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून ते कुटुंबासाठीही वेळ देतात. काही छंदही त्यांनी जोपासले आहेत. वाचन, गाणे ऐकणे तसेच शेती करणे, हे त्यांचे आवडीचे विषय. या छंदांसोबतच जलसंधारण, नागरी सोयी-सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून विविध योजना आखण्याचा छंद त्यांना आहे. आपल्या या योजना त्यांनी शासन दरबारी नेण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला; मात्र तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. आता आमदार म्हणून त्यांना या योजना अंमलात आणण्याची संधी मिळणार आहे.