बैदपुर्यातील अतिक्रमण जमीनदोस्त
By Admin | Updated: September 6, 2014 02:17 IST2014-09-06T02:17:15+5:302014-09-06T02:17:15+5:30
अकोला मनपा अधिकार्यांवर दगडफेक; परिसरात तणाव.

बैदपुर्यातील अतिक्रमण जमीनदोस्त
अकोला : बैदपुर्यातील अतिक्रमित पानटपरी व काही दुकाने धाराशायी करण्यात आली. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली. यादरम्यान, काही तरुणांनी मनपा अधिकार्यांवर दगडफेक केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केल्याने राजकारण्यांचे मनसुबे उधळल्या गेले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतचा रस्ता अतिक्रमकांनी गिळंकृत केला आहे. या मार्गावरून धड पायी चालणेदेखील कठीण झाले. या मार्गावरील बैदपुरा परिसरात चक्क रस्त्यावर वहिद खान नामक पानटपरी चालकाने अनेक वर्षांपासून ठिय्या मांडला होता. याच ठिकाणी गुड्ड पठाण नामक घोडे व्यावसायिकांनी त्यांचे घोडे बांधण्याची जागा रस्त्यावर उभारल्याने परिसरातील नागरिक प्रचंड वैतागले होते. महिनाभरापूर्वी अतिक्रमित पानटपरी हटविण्यासाठी गेलेल्या मनपा प्रशासनासह पोलिस प्रशासनाच्या कारवाईला कडाडून विरोध झाला होता. त्यानंतर पानटपरी चालकाने स्थानिक न्यायालयातून स्थगिती मिळवल्याने ही कारवाई अर्धवट पडून होती. ५ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी वहिद खान यांच्या पानट परीवरील स्थगिती न्यायालयाने उठवल्याने मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी सायंकाळी या ठिकाणी धाव घेत, पानटपरीसह परिसरातील अ ितक्रमित दुकाने जमीनदोस्त केली. कारवाई सुरू असताना, परिसरातील काही युवकांनी मनपा अधिकार्यांवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला. ही बाब शहर पोलिस उपअधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करीत गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न केला. पोलिस बंदोबस्तामुळे अनेकांचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत. परिसरातील नागरिकांनी मात्र मनपाच्या कारवाईचे खुलेआम सर्मथन केले, हे
विशेष.
** उपायुक्तांना धमकी
पठाण नामक व्यावसायिक त्याचे घोडे बांधण्यासाठी रस्त्याचा वापर करीत होता. ही जागा मोकळी करून अतिक्रमित दुकान पाडल्यानंतर संतापलेल्या व्यावसायिकाने उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांना शिवीगाळ करीत ह्यपाहूनह्ण घेण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समक्ष पार पडला, हे येथे उल्लेखनीय.
** तुम्ही सुरुवात केली, आम्ही शेवट करू!
पठाण नामक घोडे व्यावसायिकाचे अतिक्रमित दुकान पाडल्यानंतर एका काँग्रेस नगरसेवकाने प्रशासनावर जातीभेद करीत असल्याचा आरोप लावला. कारवाई करण्याची तुम्ही सुरुवात केली, याचा शेवट आम्ही करू, असा इशारावजा धमकी संबंधित नगरसेवकाने उपायुक्तांना दिली.