महिलांच्या सक्षमीकरणासाठी दोन गावे दत्तक
By Admin | Updated: April 4, 2015 01:56 IST2015-04-04T01:56:42+5:302015-04-04T01:56:42+5:30
अकोला जिल्ह्यातील दोन गावात तीन महिने राबविणार प्रेरणा प्रकल्प.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी दोन गावे दत्तक
अकोला : वाढते अत्याचार, अशिक्षितपणा व गरिबीमुळे असह्य झालेले जीवन अशा परिस्थितीत स्त्रियांना जगणे कठीण झाले आहे. त्यासाठीच महिला सक्षमीकरणाच्या केवळ कागदोपत्री योजना आखून फायद्याचं नसतं; ठोस कृती करणे आवश्यक असतं. यामुळे आपणही समाजाचे काही देणं लागतो, या विचारांनी प्रेरित होऊन शहरातील उच्चपदस्थ अधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कर्तबगार महिलांनी एकत्र येऊन स्वखर्चाने प्रेरणा प्रकल्प राबविण्याचे ठरविले. या प्रकल्पांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर सावरा मंचनपूर व मुंडगाव ही दोन गावे दत्तक घेतली असून, तीन महिने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी आयकर अधिकारी रू पा धांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंडगाव येथे ११ एप्रिल रोजी व सावरा मंचनपूर येथे याच महिन्याच्या तिसर्या आठवड्यात महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांना प्रारंभ होणार आहे. प्रेरणा प्रकल्पामध्ये रू पा धांडे, अँड. संगीता भाकरे, अरुंधती सिरसाट यांच्यासह सुषमा निचळ, डॉ. प्रदीप बोरकर, पंचायत समितीच्या माजी सभापती रमा धांडे, एलआयसी ब्रँच मॅनेजर दीपक धांडे, अँड. माया ओझा, आकोटच्या माजी नगराध्यक्ष डॉ. मनीषा मते यांचाही समावेश आहे. या प्रकल्पासाठी कोणतीही समिती वा कार्यकारणी निवडण्यात आली नाही, हे येथे उल्लेखनीय आहे.