महापालिका कर्मचा-यांनी सोमवार गाजविला
By Admin | Updated: December 23, 2014 00:42 IST2014-12-23T00:42:45+5:302014-12-23T00:42:45+5:30
महापौरांच्या दालनात महिला कर्मचा-यांचा गोंधळ; तर शिक्षकांचा मनपा आयुक्तांच्या निवासस्थानासमोर ठिय्या.

महापालिका कर्मचा-यांनी सोमवार गाजविला
अकोला: आठ महिन्यांचे वेतन देण्यास टाळाटाळ करणार्या महापालिका प्रशासनाच्या विरोधात शिक्षकांनी आंदोलन छेडले असून, आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निवासस्थानासमोर सोमवारी सायंकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने किमान सहा महिन्यांचे वेतन अदा न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचे संकेत शिक्षक संघटनांनी दिले आहेत.
त्याच प्रमाणे थकीत वेतनाच्या मुद्यावर संतप्त झालेल्या आस्थापनेवरील महिला सफाई कर्मचार्यांनी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात सोमवारी दुपारी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी महापौर तसेच उपमहापौर मनपात उपस्थित नव्हते. संतप्त महिला कर्मचार्यांची समजूत घालताना सुरक्षा रक्षकांची प्रचंड तारांबळ उडाली. अखेर विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी महिला कर्मचार्यांच्या समस्या ऐकून घेत, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी घरचा रस्ता पकडला.