सफाई कर्मचार्यांची हकालपट्टी
By Admin | Updated: July 6, 2014 00:44 IST2014-07-06T00:38:25+5:302014-07-06T00:44:57+5:30
रमजान महिन्यात साफसफाईअभावी प्रभागात घाण व कचर्याचे ढीग असल्याच्या मुद्यावरून संतप्त नागरिकांनी सफाई कर्मचार्यांची हकालपट्टी केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी बैदपुरा परिसरात घडला.

सफाई कर्मचार्यांची हकालपट्टी
अकोला : ऐन रमजान महिन्यात साफसफाईअभावी प्रभागात घाण व कचर्याचे ढीग असल्याच्या मुद्यावरून संतप्त नागरिकांनी सफाई कर्मचार्यांची हकालपट्टी केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी बैदपुरा परिसरात घडला. यामुळे सफाई कर्मचार्यांनी मनपात धाव घेत, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांना अवगत केले.
मागील अनेक वर्षांंपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणार्या सफाई कर्मचार्यांसह स्वच्छता निरीक्षकांची आयुक्तांनी प्रभागांतर्गत अदलाबदल केल्यामुळे अनेकांना पोटदुखी झाली आहे. मनपाच्या आस्थापनेवर ७४८ सफाई कर्मचारी तर पडीत वार्डाची कामे खासगी सफाई कर्मचार्यांकडून होत असताना शहरात ठिकठिकाणी घाण, कचर्याचे ढीग आहेत. अनेक नगरसेवक मर्जीतल्या सफाई कर्मचार्यांकडून घरची कामे करवून घेत असल्याने हा बदलीचा प्रयोग अनेकांच्या पचनी पडत नसल्याची स्थिती आहे. यामुळे प्रशासनाला ऐनकेन प्रकारे जेरीस आणण्याचा उद्योग काही सफाई कर्मचार्यांनी सुरू केला आहे.
प्रशासनाने नियुक्ती आदेश दिल्यावरदेखील कर्मचारी कामावर हजर न राहत नसल्याची परिस्थिती आहे. अनेकांनी आजारी रजा घेत सुटीवर जाणे पसंत केले. यामुळे ऐन रमजान महिन्यात मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये घाणीचे व कचर्याचे ढीग साचले आहेत. परिणामी प्रभाग क्र.१५ अंतर्गत येणार्या बैदपुरा परिसरातील संतप्त नागरिकांनी शनिवारी सकाळी सफाई कर्मचार्यांची हकालपट्टी केली.