रोहित्रांची दुरुस्ती करून शेतक-यांना समस्यामुक्त करा!
By Admin | Updated: November 15, 2014 00:34 IST2014-11-15T00:22:46+5:302014-11-15T00:34:21+5:30
ऊर्जा-विद्युतीकरण समन्वय समितीच्या सभेत खासदारांचे निर्देश.

रोहित्रांची दुरुस्ती करून शेतक-यांना समस्यामुक्त करा!
अकोला: ग्रामीण भागात अनेक रोहित्र जळाले असून, नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाण्याची सुविधा असल्यावरही शेतकरी सिंचन करू शकत नाही. पाण्याअभावी पिके सुकत असल्यामुळे त्वरित नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्याचे निर्देश जिल्हा समन्वय समिती ऊर्जा व विद्युतीकरणच्यावतीने शुक्रवारी आयोजित सभेत खासदार व आमदारांनी दिले.
जिल्हा समन्वय समिती ऊर्जा व विद्युतीकरणच्यावतीने विदर्भ चेम्बर ऑफ कॉर्मसच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा. संजय धोत्रे होते. यावेळी आ. गोवर्धन शर्मा, आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, समितीचे सचिव विद्युत निरीक्षण विभागाचे अजित शुक्ल, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता शरद भिसे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अनिल चव्हाण, पारस वीज निर्मिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता रवींद्र गोहणे, पारेषणचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख होते. ग्रामीण भागात अनेक रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे पाण्याची सोय असल्यावरही विद्युत पुरवठय़ाअभावी शेतकरी सिंचन करू शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. गत काही महिन्यांपासून हा मुद्दा सर्वत्र गाजत आहे. त्याचे पडसाद बैठकीतही उमटले. त्यामुळे बंद पडलेले रोहित्र त्वरित दुरुस्त करून शेतकर्यांना या समस्येपासून मुक्त करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पायाभूत आराखड्याची कामे त्वरित मार्गी लावण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.