वीज चोरी करणे भोवले
By Admin | Updated: October 19, 2014 01:03 IST2014-10-19T01:03:24+5:302014-10-19T01:03:24+5:30
मूर्तिजापूर येथे हायटेंशन केबलच्या टॉवरवरून विद्युतचोरीप्रकरण.

वीज चोरी करणे भोवले
अकोला - वीज चोरी करणार्या चार आरोपींना मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने शनिवारी दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, इलेक्ट्रिसिटी अँक्टच्या आणखी एका कलमाखाली १0 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
महावितरण कंपनीचे अभियंता टावरी २३ जून २0१३ रोजी माना येथून मूर्तिजापूरकडे येत असताना एका हायटेंशन केबलच्या टॉवरवर चार जण काम करीत असल्याचे निदर्शनास आले होते.
या प्रकरणी माना पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नईम खान मेहमूद खान, भूषण दौलतराव, शेख जमील शेख रहीम आणि कादर खाँ हमीद यांच्याविरुध्द इलेक्ट्रिसिटी अँक्टच्या कलम १३६ (विद्युत साहित्याची चोरी) आणि कलम १३९ (विद्युत प्रवाहास नुकसान पोहोचविणे) यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून साहित्याचा शोध घेतला असता नईम खान याच्याकडे लोखंडी अँगलसह इतर विद्युत साहित्य आढळून आले.
या प्रकरणी मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने कलम १३६ मध्ये चारही आरोपींना दोन वर्षांंंचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड ठोठावला तर कलम १३९ मध्ये १0 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.