लाकडी खांबांवरून दिली विद्युत जोडणी
By Admin | Updated: September 2, 2014 19:41 IST2014-09-02T19:41:40+5:302014-09-02T19:41:40+5:30
माना येथील प्रकार : वीज कंपनीच्या कर्मचार्यांचा प्रताप

लाकडी खांबांवरून दिली विद्युत जोडणी
मूर्तिजापूर: एरव्ही सर्व निकष पूर्ण केल्यानंतरही विद्युत जोडणी देण्यास टाळाटाळ करणार्या वीज वितरण कंपनीने माना येथील एका शेतकर्यास चक्क लाकडी खांबांवरून विद्युत जोडणी देण्याचा प्रताप केला आहे. मुख्य वाहिनीवरून ही जोडणी देताना दुसर्या शेतकर्याच्या शेतात हे लाकडी खांब रोवण्यात आले आहेत. पावसाळय़ात हे खांब वाकल्यामुळे शेती करणे जिकिरीचे झाल्याने सदर शेतकर्याने ही विद्युत जोडणी काढण्याची मागणी केली आहे. माना येथील शेतकरी सै. काशीद सै. इसा यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीने मुश्ताक शे. यासीन या शेतकर्यास रितसर विद्युत खांबांचा वापर न करता चक्क लाकडी बल्ल्या टाकून विद्युत जोडणी दिली आहे. शेतातील काळी जमीन भुसभुशीत असल्यामुळे पावसाळय़ात हे खांब वाकले आहेत. विद्युत वाहिनीची केबल जमिनीला टेकली आहे. त्यामुळे सै. काशीद यांना शेती करणे कठीण झाले आहे. सदर वीज वाहिनीमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनी स्थानिक अधिकार्यांकडे तक्रार केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सै. काशीद यांनी वीज कंपनीच्या माना व मूर्तिजापूर येथील सहायक अभियंता तसेच अकोला येथील कार्यकारी अभियंता यांना एक निवेदन सादर करून ही विद्युत जोडणी काढण्याची मागणी केली आहे.